आजकाल तुम्ही AI म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचं नाव खूपदा ऐकलं असेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मोठी मागणी आहे. एआयच्या वाढत्या मागणीमुळे एका अमेरिकन कंपनीला प्रचंड फायदा होत आहे. या अमेरिकन चिप बनवणाऱ्या कंपनीची ताकद इतकी आहे की जगभरातील देश आणि बड्या कंपन्या तिच्यासमोर हात जोडून उभ्या आहेत. काही वर्षांत ती जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी (Market Cap) बनली. आम्ही सांगत आहोत AI चिप मेकिंग अमेरिकन कंपनी एनविडिया कॉर्प (Nvidia Corp) बद्दल. या कंपनीची सुरुवात एका रेस्तराँपासून झाली हे फार कमी लोकांना माहीत आहे. या कंपनीच्या मालकानं एकेकाळी हॉटेलमध्ये वेटर म्हणूनही काम केलंय.
गुगल, अॅपलसारख्या कंपन्यांना टक्कर
अमेरिकन एआय चिप उत्पादक कंपनी एनविडिया कॉर्प (Nvidia Corp) गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. मायक्रोसॉफ्ट (Microsoft) आणि गुगल (Google) सारख्या जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्या Nvidia कडून जास्तीत जास्त चिप्स मिळविण्याच्या शर्यतीत आहेत. नुकतंच कंपनीचे सीईओ जेन्सेन हुआंग भारतात आले होते. रिलायन्स आणि टाटासह कंपन्यांनी चिप्ससाठी कंपनीसोबत करारही केला आहे. जेन्सन हुआंग यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. केवळ भारत किंवा अमेरिकाच नाही तर सौदी अरेबिया, चीन, तैवान, जपानमधील कंपन्याही चिप्ससाठी एनविडियाशी करार करण्याच्या प्रयत्नात आहेत.
एनविडियाची सुरुवात जेन्सेन हुआंग यांनी केली होती. हुआंग यांचा जन्म १९६३ मध्ये तैवानमध्ये झाला होता. त्यांचं बालपण तैवान आणि थायलंडमध्ये गेलं, परंतु वयाच्या ९ व्या वर्षी त्यांना आपला देश सोडून अमेरिकेत आपल्या नातेवाईकांकडे जावं लागलं. मुलांच्या सुरक्षेचा विचार करून पालकांनी हा निर्णय घेऊन त्यांना अमेरिकेतील नातेवाईकांच्या घरी पाठवलं. त्यांचं शिक्षण अमेरिकेतच झालं.
स्टेट युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी एलएसआय लॉजिक नावाच्या कंपनीत नोकरी पत्करली. इथेच त्यांनी चिप बनवायचं शिक्षण मिळालं. जेन्सेन हुआंग त्यांच्या दोन मित्रांसह रेस्तराँमध्ये अनेकदा भेटत असत. तिघांनी आपलं काम सुरू केल्यानंतर तासनतास तिथे बसून चर्चा करायचे. टेबलावर कॉफीचे अनेक कप होते. त्यांचे मित्र ख्रिस मालाचोव्स्की इंजिनिअर आणि कर्टिस प्रीम ग्राफिक्स चिप डिझायनर होते. १९९३ मध्ये या तिघांनीही एकाच रेस्तराँमध्ये बसून त्यांनी Nvidia सुरू करण्याचा निर्णय घेतला.
वाढदिवसाच्या दिवशी कंपनीची सुरुवात
त्यांच्या ३० व्या वाढदिवशी, जेन्सन हुआंग दोन मित्रांसह रेस्तराँमध्ये जेवणासाठी गेले आणि एक कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. Nvidia संदर्भात तिघांमध्ये करार झाला आणि त्याच दिवशी चिप बनवणारी कंपनी सुरू झाली. सुरुवातीला या कंपनीनं व्हिडीओ-गेम ग्राफिक्स चिप्स तयार केल्या. हळूहळू कंपनीने डेटा सेंटर आणि एआयवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. कंपनी ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स आणि इतर कम्पुटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर उत्पादनांचं डिझाईन आणि निर्मिती देखील करते.
रॉकस्टार लूक
जेन्सेन हुआंग यांची कंपनीबद्दलची आवड अशी होती की जेव्हा त्यांचे शेअर्स १०० डॉलर्सवर पोहोचले तेव्हा त्यांनी त्यांच्या हातावर कंपनीच्या लोगोचा टॅटू बनवला. आज त्यांची कंपनी ३.२९९ ट्रिलियन डॉलर्स मार्केट कॅपसह जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. त्याच्या कंपनीचं मार्केट कॅप केवळ मायक्रोसॉफ्टपेक्षा कमी आहे. हुआंग त्यांच्या लूकमुळे चर्चेत असतात. तो अनेकदा ब्लॅक बाइक लेदर जॅकेटमध्ये दिसतात. त्यांचा रॉकस्टार लूक पाहून लोक त्याच्या वयाचा अंदाज लावू शकत नाहीत.
किती आहे संपत्ती?
हुआंग १०६ बिलियन डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील १३ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. एनविडियाच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात ७०० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी आली आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार केवळ मायकल डेल (१०७ बिलियन डॉलर्स), मुकेश अंबानी (१०९ बिलियन डॉलर्स), वॉरन बफे ( १३६ बिलियन डॉलर्स) हे श्रीमंतांच्या यादीत जेन्सेन यांच्या पुढे आहेत.