Success Story Of Oyo Rooms: स्वतःवर विश्वास आणि जिद्द असेल, तर तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हॉस्पिटॅलिटी चेन OYO Rooms चे संस्थापक रितेश अग्रवाल यांनीही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर जगातील सर्वात तरुण अब्जाधीशांच्या यादीत जागा मिळवली आहे. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी ते दिल्लीच्या रस्त्यावर सिमकार्ड विकायचे. आज आज रितेश अग्रवाल यांचा OYO Rooms व्यवसाय फक्त भारतात नाही, तर जगातील 80 देशांतील 800 शहरांमध्ये पसरला आहे. कमी वेळात लोकप्रिय झालेल्या या हॉटेल व्यवसायातून रितेश अग्रवाल अतिशय तरुण वयात तब्बल 8000 कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक बनले आहेत.
शिक्षण अर्ध्यावर सोडलेरितेश अग्रवालचा जन्म 16 नोव्हेंबर 1993 रोजी ओरिसातील कटक येथील एका सामान्य मारवाडी कुटुंबात झाला. आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे आणि नोकरी करावी, अशी रितेशच्या आई-वडिलांची इच्छा होती. पण आई-वडिलांच्या स्वप्नांच्या विपरीत रितेश यांनी उद्योजक बनण्याचे ठरवले. पुढील शिक्षणासाठी रितेश दिल्लीला गेले आणि दिल्लीतील इंडियन स्कूल ऑफ बिझनेस अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेतला, पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळेच चालू होते. त्यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडले. यानंतर घरच्यांनी आयआयटी प्रवेशाच्या तयारीसाठी कोटाला पाठवले, पण रितेश यांना तिथे जावेसे वाटले नाही.
रस्त्यावर सिम कार्ड विकले अखेर रितेश यांनी व्यवसायाची वाट पकडली. रितेश यांनी 2012 मध्ये ओरवेल स्टेज नावाचा स्टार्टअप सुरू केला, पण हे काम त्यांना जमले नाही. यामध्ये मोठे नुकसान झाले. यानंतर ते दिल्लीला परतले. त्यांच्याकडे पैसेही शिल्लक नव्हते, धंद्याचे भूत डोक्यातून उतरले नाही. काहीच हाती न लागल्याने ते रस्त्यावर फिरुन सिमकार्ड विकू लागले.
अशी झाली OYOची सुरुवात रितेश यांना सुरुवातीपासूनच प्रवासाची खूप आवड होती. अभ्यासातून वेळ मिळाला की ते बाहेर फिरायला जायचे. 2009 मध्ये रितेश डेहराडून आणि मसुरीला फिरायला गेले आणि तिथल्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाले. इथे पोहोचल्यानंतर रितेशला समजले की, देशात अनेक सुंदर ठिकाणे आहेत, ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. अशा ठिकाणांबद्दल लोकांना सांगितले पाहिजे, असे त्यांना वाटले. यानंतर रितेशने ऑनलाइन सोशल कम्युनिटी तयार करण्याचा विचार केला.
2013 मध्ये रितेशची थील फेलोशिपसाठी निवड झाली, ज्यातून त्यांना सुमारे 75 लाख रुपये मिळणार होते. या पैशातून त्यांनी ओयो रुम्स व्यवसाय सुरू केला. याआधी त्यांनी दीर्घ संशोधन केले होते. त्यांनी आपल्या कंपनीचे नाव OREVAL Stays ठेवले. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने त्यांनी स्वस्त दरात हॉटेल बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली. रितेश अग्रवाल यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे तर, त्यांची एकूण संपत्ती 1.1 अब्ज डॉलर्स, म्हणजे सुमारे आठ हजार कोटी रुपये आहे. देशातील झपाट्याने वाढणाऱ्या व्यवसायात ओयोची गणना केली जाते.