Join us

Success Story : एकेकाळी दांम्पत्यावर होतं ५ कोटींचं कर्ज, पत्नीची बिझनेस आयडिया आणि आज आहेत ४०० कोटींचे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 11:21 AM

या दांम्पत्यानं आपल्या महेनतीच्या आणि चिकाटीच्या जोरावर आज ४०० कोटींचं साम्राज्य उभं केलं आहे.

व्यवसाय म्हटलं की यश अपयश हे आलंच. व्यवसाय सुरू केला की पहिल्याच दिवसापासून नफा होतोच असं नाही. त्यासाठी तुमच्याकडे संयम आणि चिकाटी असणं आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या व्यवसायात तुम्हाला चढ उतार पाहावे लागतात तेव्हा खचून न जाता अगदी भक्कमपणे उभं राहणं महत्त्वाचं असतं. आपल्या मेहनतीच्या जोरावर अगदी कर्जातून बाहेर येत शेकडो कोटींचं साम्राज्य उभं करणारं एक दांम्पत्य म्हणजे सीके कुमारवेल आणि त्यांच्या पत्नी वीणा कुमारवेल.

सीके कुमारवेल नॅचरल्स सलॉन चेनचे सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांचा आणि त्यांच्या पत्नी वीणा यांचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता. सीके कुमारवेल एका व्यवसायिक कुटुंबातूनच आहेत. ते लहान असतानाच त्यांच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं. त्यानंतर आपल्या मुलांचा साभाळ करतानाचा त्यांच्या आईचा संघर्ष त्यांनी पाहिला. कालांतरानं त्यांच्या लग्नानंतर त्यांनी काही निराळं करण्याचा विचार सुरू केला. २००० मध्ये त्यांनी आपल्या पत्नीसह एक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.पत्नीची मोठी भूमिकानॅचरल्स सलॉनच्या सहसंस्थापक आणि सीके कुमारवेल यांच्या पत्नी वीणा यांनी पहिलं सलॉन लाँच करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९९३ मध्ये कुमारवेल यांनी नेचर केअर ही कंपनी सुरू केली होती. त्या कंपनीची उत्पादनं संपवण्याचाही त्यांचा प्रयत्न होता. नेचर केअरनं रागा हर्बल पावडर हा एक यशस्वी ब्रँड लाँच केला.  परंतु नफ्यावर चालणाऱ्या कंपनीनं अधिक उत्पादनं लाँच केल्यानंतर तसंच दक्षिणेव्यतिरिक्त अन्य ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये विस्तार केल्यानंतर त्यांना या व्यवसायात तोटा होऊ लागला. 

"वित्त, विपणन, विक्री आणि उत्पादन ही व्यवसायाची चार चाकं आहेत. मी विक्री आणि विपणन यावर तर लक्ष दिलं, परंतु त्यामुळे वित्त हे चाक निखळलं. ते दुरुस्त करण्याऐवजी मी गाडीतूनच उतरलो," असं कुमारवेल सांगतात. कालांतरानं त्यांनी आपली कंपनी आपले भाऊ रंगनाथन यांना विकली. मी त्या व्यवसायात कायम राहिलो असतो तर गोष्टी कदाचित बदलल्या असत्या, असंही ते म्हणाले. या कालावधीत त्यांनी आपली संपत्ती गमावली, शिवाय त्यांनी आपल बचतही गमावली. यानंतर त्यांच्या तब्बल ५ कोटी रुपयांचं कर्ज झालं. दरम्यान, त्यांनी आपली पत्नी वीणा यांच्यासह व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि नॅचरल्स सलॉनची सुरूवात झाली.

६८० पेक्षा अधिक शाखानॅचरल सलॉनच्या भारतभरात ६८० पेक्षा जास्त शाखा आहेत. या शाखांचा विस्तार करणं त्याच्यासाठी इतकं सोपं नव्हतं. त्यांनी व्यवसायाची पहिली सहा वर्ष होणारा तोटा कमी करण्यात घालवली. कुमारवेल यांनी त्याच्या सलॉन चेनचा विस्तार करण्यासाठी अनेक बँकांशी संपर्क साधला होता. मात्र त्यांनी हा व्यवसाय फारसा कार्यक्षम नाही हे सांगत त्याला नकार दिला. सलॉन उद्योगावर विश्वास नसतानाही, एका बँकरनं त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना लोन दिलं. त्यांनी ६ वर्ष प्रचंड मेहनत घेतली. त्यानंतर त्यांनी एकूण ६ शाखा सुरू केला आणि पाहता पाहता चेन्नईतील सर्वात मोठी सलॉन चेन बनली.

एवढंच नाही तर त्यांच्याकडे १० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत आणि ४०० हून अधिक महिला उद्योजक नॅचरल सलॉनच्या बॅनर अंतर्गत काम करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांचा हा व्यवसाय सध्या ४०० कोटींच्या पार गेला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी हे यातील ४९ टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यांच्यात सुरुवातीच्या टप्प्यातील चर्चा सुरू असल्याची माहितीही माध्यमांमधून समोर आली होती.

टॅग्स :व्यवसायपैसा