Join us

Success Story: नोकरी सोडून सुरू केलं कपडे धुण्याचं स्टार्टअप, आज आहे ५८५ स्टोअर्सचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 5:24 PM

गेल्या वर्षी या स्टार्टअपची कमाई १०० कोटींपेक्षा अधिक होती.

मध्यमवर्गीय कुटुंबातून येणारे सहसा सरकारी नोकरीच्या शोधात असतात किंवा अनेक जण परमनंट नोकरीच्या शोधात असतात. खासगी नोकरी असेल तर ब्रँडही मोठा हवा अशी अनेकांची इच्छा असते. परंतु अशा सर्व इच्छा पूर्ण होऊनही लखनौच्या गौरव निगमने चांगल्या नोकरीला रामराम ठोकला. इतकंच नाही तर त्यानं कपडे धुण्याचं काम सुरू केलं. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. आज देशातील १८० हून अधिक शहरांमध्ये त्यांची ५८५ स्टोअर्स आहेत. गेल्या वर्षी त्याच्या स्टार्टअपनं कपडे धुण्याच्या व्यवसायातून तब्बल ११६ कोटी रुपयांची कमाई केली.

लखनौचा रहिवासी असलेल्या गौरव यांनी तिथल्या प्रसिद्ध ला मार्टिनियर कॉलेजमधून बीकॉमचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी पुण्यातील सिम्बायोसिसमधून एमबीए केलं. एमबीएनंतर दूरसंचार क्षेत्रातील कंपनी एअरटेलमध्ये त्यांना नोकरी मिळाली. तेथे १२ वर्ष काम केल्यानंतर त्यांच्याकडे लावा या मोबाईल कंपनीत प्रोडक्ट हेड पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. परंतु ही नोकरी सोडल्यानंतर त्यांनी नवीन चावला यांच्यासोबत टंबलड्राय या स्टार्टअपची सुरूवात केली. ही कंपनी देशभरात ड्राय क्लीन स्टोअर्स चालवते.

कसं सुरू झालं टंबलड्राय?

टंबलड्राय कसं सुरू झालं यासंदर्भात गौरव निगम यांनी माहिती दिली. लावामध्ये प्रोडक्ट हेड म्हणून काम करत असताना दर महिन्यातील १५ दिवस चीन मध्ये राहावं लागत होतं. यादरम्यान ते हॉटेलमध्ये राहत होते. परंतु त्या ठिकाणी कपडे धुण्यास देत नव्हते. त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी कम्युनिटी ड्रायक्लिन स्टोअर शोधलं. त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली आणि भारतात टंबलड्रायची सुरूवात झाली. सुरुवातीला त्यांनी ताज, ओबेरॉय अशा मोठ्या हॉटेल्सच्या ड्रायक्लिनिंग विंगचा अभ्यास केला. दुबईतील ड्राय क्लिनिंग स्टोअर्सचा दौरा केला. यानंतर त्यांनी आपल्या स्टोअर्सची सुरूवात केली.

यात कोणतीही कंपनी नाही

बहुतांश क्षेत्रांमध्ये मोठ्या कंपन्यांचं वर्चस्व आहे. परंतु ड्रायक्लिनिंगमध्ये असंघटीत क्षेत्र आहे. यामुळे यात नशीब आजमावण्याचा विचार केला, असं गौरव निगम म्हणाले. यासाठी त्यांनी मोठा रिसर्च केला. ड्राय क्लिनिंग मशीन कुठून आणणार, कपडे धुण्यासाठी आवश्यक सामग्री कुठून आणली जाईल यावर रिसर्च केला आणि नंतर स्टोअर्सची सुरूवात केली.

उत्तम टेक्नॉलॉजीची निवड

टंबलड्रायची स्थापना करण्यासाठी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाची निवड करण्यात आली. त्यांनी स्वीडनची कंपनी इलेक्ट्रोलक्स आणि स्पेनची कंपनी डोमस यांच्याकडून मशीन मागवल्या. त्याचप्रमाणे स्टीम प्रेससाठी इटालियन कंपनी ट्रेव्हिलकडून मशीन मागवण्यात आल्या होत्या. लाँड्री केमिकल्ससाठी बायो डिग्रेडेबल मटेरियल निवडण्यात आलं. त्यानंतर जर्मन कंपनी Seitz चे ड्राय क्लीनिंग केमिकल निवडण्यात आले आणि हे देशभरात पसरलेल्या कंपनीच्या स्टोअरमध्ये वापरले जातात.

चार वर्षांत ५८५ स्टोअर्स

कंपनी सुरू होऊन चार वर्षेच झाली आहेत. एवढ्या दिवसात कंपनीची पोहोच देशातील १८० हून अधिक शहरांमध्ये झाली आहे. सध्या कंपनी ५८५ ड्राय क्लीन स्टोअर्स चालवत आहे. कंपनीच्या कमाईचा विचार केला तर त्यांच्या कंपनीनं गेल्या वर्षी ११६ कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता.

टॅग्स :व्यवसायभारत