नवी दिल्ली : शिकून डॉक्टर, इंजिनीअर आणि सरकारी अधिकारी व्हायचे हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. पण, तरीही पुढे जाण्याची इच्छा कधीच संपत नाही. डॉक्टर आणि सिव्हिल सर्व्हिस सारख्या पेशात आल्यानंतर आता आपल्या आयुष्यातील उद्देश पूर्ण झाला, असे बहुतेकांना वाटते. मात्र माजी आयएएस रोमन सैनी यांनी असा विचार चुकीचा ठरवला आहे.
रोमन सैनी यांनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी डॉक्टर आणि नंतर वयाच्या 22 व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयएएस अधिकारी बनले. पण करिअरच्या इच्छेपोटी त्यांनी आयएएसची नोकरी सोडून ट्यूशन बिझिनेस सुरू केला आणि 15 हजार कोटींची कंपनी स्थापन केली. ऑनलाइन ट्यूशन प्लॅटफॉर्म अनअॅकॅडमीचे सह-संस्थापक रोमन सैनी हे राजस्थानचे आहेत. त्यांनी बिझिनेस सुरू करण्यासाठी आपली आयएएसची नोकरी एका झटक्यात सोडली आणि अॅड टेक प्लॅटफॉर्म अनअॅकॅडमी सुरू केली.
वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी रोमन सैनी डॉक्टर होण्यासाठी एम्स प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. ते इथेच थांबले नाहीत, त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. वयाच्या 22 व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर रोमन सैनी हे मध्य प्रदेशात आयएएस अधिकारी म्हणून रुजू झाले. रोमन सैनी आयएएस होऊनही समाधानी नव्हते. व्यावसायिक बनण्याच्या इच्छेने त्यांनी देशातील सर्वोच्च सरकारी नोकरी सोडली. 2015 मध्ये, प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिल्यानंतर, त्यांनी गौरव मुंजाल आणि हेमेश सिंग यांच्यासोबत अनअॅकॅडमीची स्थापना केली.
अॅड टेक प्लॅटफॉर्म अनअॅकॅडमीचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. या कंपनीची वार्षिक उलाढाल 15000 कोटींच्या पुढे गेली आहे. हे ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्म तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. हा स्टार्टअप सुरू करण्यामागे यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंगसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हा होता. जेणेकरून विद्यार्थ्यांना लाखो रुपये खर्च करावे लागू नयेत. या उद्देशात रोमन सैनी आणि कंपनीचे इतर सह-संस्थापक खूप यशस्वी झाले आहेत.