Success Story: मेहनत आणि मनात जिद्द असली की आपल्याला यशाचं शिखर नक्कीच गाठता येतं असं म्हणतात. अशीच एक कहाणी आहे मूळचे सांगलीचे असलेले यशस्वी उद्योजक अशोक खाडे यांची. एकेकाळी उपाशी पोटी राहून आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपलं मोठं साम्राज्य उभं केलं.
अशोक खाडे मूळचे सांगलीचे रहिवासी. लहानपणी गरीबीत दिवस काढलेले अशोक खाडे आज मुंबईतील परिचित उद्योजकांपैकी एक आहेत. एकेकाळी महिन्याला ९० रुपये कमावणाऱ्या खाडे यांचं कंपनीचं महिन्याचं टर्नओव्हर ५०० कोटी रुपये आहे. पाहूया त्यांचा आजवरचा प्रवास कसा होता.
सहा बहिण-भाऊ आणि गरिबीअशोक खाडे आणि त्यांच्या कुटुंबानं एकेकाळी खूप गरिबी पाहिली. अनेकदा खाडे यांना उपाशी पोटी झोपूनही दिवस काढावे लागले. ही परिस्थिती त्यांनी लहानपणी पाहिली होती. याच गरिबीमुळे त्यांचे वडील मुंबईला गेले आणि नोकरी करू लागले. पण तरीही कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यात खूप अडचणी येत होत्या.
गरिबीत दिवस काढावे लागत असले तरी अशोक खाडे यांनी आपलं शिक्षण मात्र कायम ठेवसं. गरिबीतून बाहेर पडायचं असेल तर शिक्षण हा एकमेव मार्ग आहे असं त्यांना वाटत होतं. पुढचं शिक्षण घेण्यासाठी खाडे आपल्या मोठ्या भावाकडे मुंबईला राहायला गेले. यादरम्यान त्यांच्या भावाला माझगाव डॉकयार्जमध्ये प्रशिक्षणार्थी वेल्डर म्हणून काम मिळालं होतं. त्यांच्या भावानं त्यांना कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यास सांगत आर्थिक मदतही करण्याचं आश्वासन दिलं.
शिक्षणाच्या खर्चासाठी केलं कामखाडे यांनी कॉलेजची फी भरण्यासाठी ट्यूशन घेण्यास सुरूवात केली. डिप्लोमानंतर त्यांना आपलं शिक्षण सुरू ठेवायचं होतं. पण कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी प्रशिक्षणार्थी म्हणू काम सुरू केलं आणि त्याचे त्यांना ९० रुपये मिळत होते. त्यांना जहाजांच्या डिझायनिंगचं आणि पेंटिंगचं प्रशिक्षण देण्यात आलं.
नोकरीनंतर सुरू केला व्यवसायत्यानंतर त्यांनी जहाजांचं डिझाईन केलं आणि ४ वर्षांनी त्यांची कायमस्वरूपी ड्राफ्ट्समन म्हणून नियुक्ती झाली. त्यांचा मासिक पगार वाढून ३०० रुपये झाला. यादरम्यान अशोक खाडे यांनी शिक्षण सुरू ठेवत पदवी मिळवली. ४ वर्षे सेवा दिल्यानंतर अशोक खाडे यांची कंपनीच्या क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये बदली झाली. यादरम्यान त्यांना कंपनीच्या वतीनं त्यांना जर्मनीला जाण्याची संधी मिळाली आणि नव्या टेक्नॉलॉजीबद्दल त्यांना शिकण्याची संधी मिळाली.
यानंतर त्यांनी आणि त्यांच्या भावानं भारतात आपला स्वत:चा व्यवसाय दास ऑफशोअर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड सुरू केला. सुरुवातीला त्यांच्यासमोर अनेक आव्हानं आली. परंतु त्यांनी त्या आव्हानांचा सामना करत मेहनत सुरू ठेवली. आज त्यांच्या क्लायंट्समध्ये ओएनजीसी, ब्रिटीश गॅस, ह्युंदाई, एस्सार, एलअँडटी आणि अन्य कंपन्यांचा समावेश आहे. कंपनीनं आतापर्यंत १०० समुद्री प्रकल्प पूर्ण केले आहेत. खाडे यांच्या कंपनीत आज ४५०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या कंपनीचा वार्षिक महसूल ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.