Join us
Daily Top 2Weekly Top 5

रातोरात 40 कोटींची कंपनी कोसळली, हार न मानता तिघा मित्रांनी उभारला 300 कोटींचा व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 16:53 IST

आव्हानांना तोंड देऊनच माणूस यशस्वी उद्योजक बनू शकतो, हेच यातून सिद्ध होते.

Success Story: कुठलाही व्यवसाय करायचा असेल, तर धोका पत्करावा लागतो. व्यवसायात अनेक प्रकारच्या अडचणी-आव्हाने येतात. या आव्हानांना तोंड देऊनच माणूस यशस्वी उद्योजक बनू शकतो. आम्ही तुम्हाला अशा तीन मित्रांची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने केवळ जोखीम पत्करली नाही, तर दिवाळखोर होऊनही धैर्य दाखवले आणि आपली कोट्यवधी रुपयांची कंपनी उभारली.

संघर्ष आणि यशाची कहाणी तीन मित्रांची आहे, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर 40 कोटी रुपयांची कंपनी उभारली. मेहनतीचे फळ मिळाले असे त्यांना वाटले, पण रातोरात ही कंपनी दिवाळखोरीत निघाली आणि तिघेही रस्त्यावर आले. पैसा बुडाला पण त्यांनी हिंमत हरली नाही. यानंतर तिघांनी पुन्हा मेहनत करुन पूर्वीपेक्षा 10 पट मोठी कंपनी उभारली. 

कॉलेजमध्येच ठरवलेविनय सिंघल, प्रवीण सिंघल आणि शशांक वैष्णव, यांनी कॉलेज पास होताच स्टार्टअप सुरू करण्याचे स्वप्न पाहिले. त्यांनी मार्क झुकरबर्गच्या फेसबुकसारखा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याचे ठरवले. त्यांनी फेसबुकवरच WittyFeed नावाचे पेज सुरू केले, ज्यात मजेशीर आणि मनोरंजक कंटेट शेअर केला जायचा. हळूहळू त्यांची कंपनी जागतिक स्तरावर काम करू लागली. यातून त्यांनी 40 कोटींची कमाईदेखील केली. पण, अचानक 25 नोव्हेंबर 2018 रोजी फेसबुकने त्यांचे पेज ब्लॉक केले. यानंतर ते तिघेही रस्त्यावर आले.

पुन्हा नव्याने व्यवसाय उभारलाविनय सिंगलने सांगितले की, त्यावेळी सर्व काही संपल्यासारखे वाटत होते. नुकसान खूप होते, पण त्यांनी हिंमत ठेवली. या कठीण काळातही त्यांनी बहुतांश कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांचा पगार दिला. 3 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर तिन्ही मित्रांना स्टेज अॅप तयार करण्याची कल्पना सुचली. यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांची मदत मागितली. विनय आणि त्यांच्या तीन मित्रांचे धाडस पाहून सर्व कर्मचारी कामाला सज्ज झाले. यानंतर, 1 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांनी STAGE अॅप लॉन्च केले. आता त्यांच्या कंपनीचे मूल्यांकन 300 कोटी रुपयांपर्यंत गेले आहे.

काय आहे स्टेज अॅप?STAGE अॅप हे एक OTT प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर हरियाणवी, मारवाडी यांसारख्या बोलींमध्ये स्थानिक कंटेट, वेब सिरीज आणि शॉर्टफिल्म उपलब्ध आहेत. STAGE अॅपला स्थानिक भाषेतील कंटेटचा Netflix देखील म्हणतात. आतापर्यंत 5 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी हे अॅप प्लेस्टोअरवरुन डाउनलोड केले आहे. या अॅपद्वारे या तिन्ही मित्रांनी नवी ओळख मिळवली आहे.

 

टॅग्स :व्यवसायगुंतवणूकपैसाप्रेरणादायक गोष्टी