UP Richest Person: आज आपण अशा उद्योजकाच्या यशाची कहाणी वाचणार आहोत. ज्यांचा तुमच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आला असणार. ही सक्सेस स्टोरी आहे, उत्तर प्रदेश राज्यातील धन्नासेठ यांची. लोकसंख्या आणि अर्थव्यवस्थेच्या बाबतीत यूपीला देशात मोठे स्थान आहे. या राज्यात अनेक श्रीमंत व्यापारी आहेत. पण, २२ कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात श्रीमंतांच्या यादीत कानपूरच्या मुरलीधर ग्यानचंदानी यांचे नाव अग्रस्थानी आहे. हुरुन रिच लिस्टनुसार मुरलीधर ग्यानचंदनी हे यूपीचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. विशेष म्हणजे ते कोणत्याही सॉफ्टवेअर किंवा फायनान्शियल फर्मचे मालक नाही. तर सर्फ आणि साबण व्यवसायातून त्यांनी इतका मोठा पल्ला गाठला आहे. त्यांची उत्पादने आज प्रत्येक घरात वापरली जातात. एवढेच नाही तर हे उत्पादन आपल्या सेगमेंटमध्ये देशातील दुसरा सर्वात मोठा ब्रँड बनला आहे.
मुरलीधर ग्यानचंदानी यांच्या उत्पादनाचे नाव 'घडी डिटर्जंट'. डोळ्यांसमोर आली की नाही जाहिरात? कानपूरचे रहिवासी असलेल्या मुरलीधर ग्यानचंदानी यांनी या डिटर्जंटने देशभरात आपला ठसा उमटवला आहे. मुरलीधर हे रोहित सरफॅक्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड (RSPL) ग्रुपचे मालक आहेत.
वडिलांनी सुरू केला साबणाचा व्यवसाय
मुरलीधर ग्यानचंदानी यांना त्यांचे वडील दयालदास ग्यानचंदानी यांच्याकडून साबण व्यवसायाचा वारसा मिळाला. ते ग्लिसरीन वापरून साबणाची निर्मिती करत होते. मग मुरलीधर यांनी वडिलांचा व्यवसाय पुढे नेला. २२ जून १९८८ रोजी त्यांनी RSPL ची स्थापना केली. यापूर्वी त्यांच्या फर्मचे नाव श्री महादेव सोप इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड होते. मुरलीधर ग्यानचंदानी यांनी या ब्रँड अंतर्गत अनेक उत्पादने बनवली. यात 'घडी डिटर्जंट पावडर' हे त्यांचं उत्पादन घराघरात पोहचलं. या उत्पादनातून त्यांनी नाव आणि पैसा दोन्ही कमावले.
घडी डिटर्जंट पावडरने पोहचले देशभर
घडी डिटर्जंटच्या यशाने मुरलीधर ग्यानचंदानी देशभर पोहचले. आज त्यांची गणना यूपीच्या सर्वात श्रीमंतांमध्ये होते. हुरुन रिच लिस्टनुसार, मुरली धर ग्यानचंदानी यांच्याकडे जवळपास १२००० कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते उत्तर प्रदेशचे सर्वात श्रीमंत उद्योगपती असण्यासोबत देशातील १४९ वे अब्जाधीश व्यापारी आहेत.