एखाद्या वृत्तामुळे एका कंपनीच्या शेअर्सची अचानक खरेदी-विक्री झाली किंवा होत असल्याचं आपण पाहिलं असेल. नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशनच्या (NCC) शेअरबाबतही असंच काही घडलं आहे. या कंपनीच्या तिमाही निकालाचं वृत्त समोर आलं आणि गुंतवणूकदारांनी थेट कंपनीच्या शेअरवर उड्या घेतल्या.
लॉजिस्टिक मॅनेजमेंट नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशनच्या शेअरची किंमत बुधवारी कामकाजादरम्यान २० रुपयांच्या पातळीवर होते. त्याच वेळी, गुरुवारी बीएसई निर्देशांकावर या शेअरची किंमत २३.९० रुपयांवर पोहोचली. एका दिवसाच्या तुलनेत या शेअरच्या किंमतीत १९.८० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
होळीच्या सणामुळे शुक्रवारी शेअर बाजारात व्यवहार बंद ठेवण्यात आले. आता सोमवारी शेअरबाबत गुंतवणूकदारांच्या प्रतिक्रिया पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. १८ जानेवारी रोजी या शेअरनं २९.४० रुपयांची पातळी गाठली होती. ही या शेअरची ५२ आठवड्यांची सर्वोच्च पातळी आहे. नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशननं (NCC) चालू आर्थिक वर्षाचे त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीचा महसूल ५५० कोटी रुपयांहून अधिक आहे. दुसरीकडे, निव्वळ नफ्याच्या बाबतीत, डिसेंबर तिमाहीत तो ११.३७ दशलक्ष रुपये होता. तर त्यापूर्वी याच तिमाहीत तो ८.२८ दशलक्ष रुपये होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत कंपनीचा निव्वळ नफा २९.९९ दशलक्ष रुपये इतका होता, जो मागील वर्षी याच कालावधीत १५.३२ दशलक्ष रुपये होता.