Sudha Murty : उद्योगपती रतन टाटा यांचा साधेपणा आणि दातृत्वाचे किस्से सांगताना लोक आजही थकत नाहीत. अगदी रिक्षाचालकापासून मोठमोठ्या अब्जाधीश लोकांपर्यंत त्यांची क्रेझ पाहायला मिळते. राज्यसभा खासदार तथा इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती (Sudha Murty) यांना टाटा ट्रस्टचे (Tata Trusts) दिवंगत अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांच्याबद्दल विशेष स्नेह होता. एकदा त्यांनी रतन टाटा यांच्याकडे २ भेटवस्तू मागितल्या होत्या. रतन टाटा यांनीही क्षणाचाही विलंब न लावता त्यांना त्या दोन्ही भेटवस्तू दिल्या. सुधा मूर्ती यांना त्या दोन्ही गोष्टी इतक्या आवडतात की आजही त्यांच्या ऑफिसमध्ये या गोष्टी डोळ्यासमोर असतात.
सुधा मूर्तींनी रतन टाटांकडे काय मागितलं?
सुधा मूर्ती यांनी रतन टाटा यांना जमशेदजी टाटा आणि जेआरडी टाटा यांचे फोटो मागितले होते. रतन टाटा यांनी त्यांना ही दोन्ही छायाचित्रे मूर्तींना पाठवून दिली. सुधा मूर्ती म्हणाल्या की, रतन टाटा यांच्या या जगातून जाण्याने झालेले नुकसान कोणीही भरून काढू शकत नाही. त्यांचा साधेपणा आणि प्रामाणिकपणाचे वलय लोकांवर पाहायला मिळते. ते नेहमी इतरांच्या कल्याणाचा विचार करणारी व्यक्ती होती. टाटा सन्सच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी त्यांच्या कंपन्या, कर्मचारी, समाज आणि राष्ट्रासाठी प्रेरणादायी कार्य केले.
रतन टाटा यांच्यासारखी दुसरी व्यक्ती भेटली नाही : मूर्ती
त्यांच्या साधेपणाने मी प्रभावित झाल्याचे सुधा मूर्ती यांनी सांगितले. त्यांच्या आत एक करुणेची भावना होती. मी त्यांना भेटल्यानंतर समजलं की की ते इतरांबद्दल खूप विचार करतात. मला त्यांची नेहमी आठवण येईल. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. त्यांच्या जाण्याने भारतीय व्यवसायाचे एक युग संपले. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला त्यांच्यासारखा माणूस भेटला नाही. जीवनात सचोटी सर्वात महत्त्वाची असते, जी प्रत्येकाकडे नसते. त्यांचा संयम शिकण्यासारखा होता. ते एक सामान्य माणूस होते. मला त्यांच्याकडूनच सेवाभाव शिकायला मिळाला. रतन टाटा गेल्याने माझे वैयक्तिक नुकसान झालं आहे.