मुंबई : कृषी क्षेत्राचा विकास झाल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखता येतील. त्याच्या आत्महत्येला कर्जाचे ओझे हे एकमेव कारण नाही, असे रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच.आर. खान यांनी रविवारी म्हटले. शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफी देण्याबद्दलही त्यांनी इशारा दिला.नाबार्डच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. दुखणे झाल्यावर ते बरे करण्यापेक्षा ते होऊ नये हेच चांगले, असे सांगून खान म्हणाले की, काही प्रसंगांमध्ये कर्जमाफी आवश्यक असते; परंतु दूरवरचा विचार केला तर अशा कर्जमाफीची वेळ येऊ नये. कृषी क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांची आत्महत्या यात नकारात्मक संबंध (जवळपास ०.७२ टक्का) आहे. म्हणजे जेव्हा कृषी क्षेत्रात वाढ असते तेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतात. दिल्लीतील एका राजकीय मेळाव्यात गजेंद्र सिंह राठोर या शेतकऱ्याची आत्महत्या हेच दाखविते की कृषी क्षेत्रात अजून प्रश्न आहेत. अनेकांनी असेही सुचविले आहे की, कृषी क्षेत्राचा रचनात्मक कायापालट झाला पाहिजे. कर्जबाजारीपणाशिवाय अपेक्षित प्रमाणात पीक न येणे, त्यासोबत सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय बाजूही त्याच्या आत्महत्येला कारण ठरतात, असे एच.आर. खान यांनी यासंदर्भात झालेल्या विविध अभ्यासांचा दाखला देत सांगितले.कृषी क्षेत्रातील उत्पादन कसे वाढेल यावर लक्ष केंद्रित करण्यात आले; परंतु शेतकऱ्याचे उत्पन्न कसे वाढेल याकडे जास्त लक्ष दिले गेले नाही, असे खान यांनी सांगितले. कृषी क्षेत्राला गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर पतपुरवठा करण्यात आला असला तरी कृषी क्षेत्राचा विस्तार व वेगवेगळ्या प्रकारची शेती लक्षात घेता या पतपुरवठ्यात बरेच दोष आहेत, असे खान यांनी सांगितले.
शेती विकास झाल्यास आत्महत्या थांबतील
By admin | Published: July 13, 2015 12:16 AM