Join us  

नोकरीचे ठिकाण नाही वाटत महिलांना अनुकूल

By admin | Published: April 05, 2017 4:31 AM

नोकरीत असलेल्या ७० टक्के महिलांना त्यांचे कामकाजाचे ठिकाण अनुकूल वाटत नसल्याचे एका अहवालातून समोर आले.

चेन्नई : नोकरीत असलेल्या ७० टक्के महिलांना त्यांचे कामकाजाचे ठिकाण अनुकूल वाटत नसल्याचे एका अहवालातून समोर आले. २५०० महिलांच्या सर्वेक्षणातून अनेक बाबींवर प्रकाशझोत पडला आहे. आमच्या संस्थेत अधिक समानता नाही, असे अनेक महिलांचे मत आहे. पदोन्नती असो की, संस्थेत मिळणारे नेतृत्व असो यात पुरु षांनाच झुकते माप मिळत असल्याचे दिसून येत आहे. ७० टक्के महिलांचे असे मत आहे की, त्यांचे कार्यस्थळ महिलांसाठी अनुकूल नाही. या सर्व्हेतील ९५ टक्के महिलांनी त्यांचे स्थान कनिष्ठ दर्जाचे असल्याचे म्हटले आहे. ७५ टक्के महिलांचे म्हणणे आहे की, त्यांचे व्यवस्थापन महिलांना अतिशय दुय्यम संधी देते. ४० टक्के महिलांनी त्यांचे वेतन कमी असले तरी त्यावर समाधान व्यक्त केले आहे. ५० टक्के महिलांनी यावर उलटसुलट मत नोंदविले असून १० टक्के महिलांनी हे वेतन चांगले असल्याचे सांगितले. संस्थेतील प्रशिक्षणही सुमार दर्जाचे असल्याचे ८० टक्के महिलांचे मत आहे. या पाहणीनुसार सुमारे ५०० कंपन्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करतात. मातृत्वाशी संबंधित योजना, सोयी सुविधाही मिळत नसल्याचे मत ३५ टक्के महिलांनी व्यक्त केले आहे. १० टक्के महिलांनी त्यांना मिळणाऱ्या सुविधा चांगल्या असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)