Join us

Sula Vineyards IPO : 'या' Wine कंपनीचा 12 डिसेंबरला आयपीओ उघडणार; 1000 कोटी जमा करण्याची तयारी सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 4:01 PM

Sula Vineyards IPO : या आयपीओच्या माध्यमातून कंपनी बाजारातून 950 ते 1000 कोटी रुपये उभारू शकते. लवकरच प्राइस बँडची देखील घोषणा केली जाईल.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी वाईन (Wine)उत्पादक कंपनी सुला वाईनयार्ड्स (Sula Vineyards) पुढील आठवड्यात आपला आयपीओ (IPO) लॉन्च करणार आहे. सुला वाईनयार्ड्सचा आयपीओ 12 डिसेंबर 2022 रोजी अर्जांसाठी खुला होईल आणि गुंतवणूकदार 14 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतील. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी बाजारातून 950 ते 1000 कोटी रुपये उभारू शकते. लवकरच प्राइस बँडची देखील घोषणा केली जाईल.

सुला वाईनयार्ड्स स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाली तर स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणारी ही देशातील पहिली वाइन बनवणारी कंपनी असणार आहे. आयपीओ 9 डिसेंबर 2022 रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल आणि 12 ते 14 डिसेंबरपर्यंत आयपीओ लोकांसाठी खुला होणार आहे. ऑफर फॉर सेलद्वारे आयपीओमध्ये निधी उभारला जात आहे. म्हणजेच कंपनीचे गुंतवणूकदार किंवा प्रोमोटर्स आपली इक्विटी विकतील. सुला वाईनयार्ड्स ऑफर फॉर सेलद्वारे प्रत्येकी 2 रुपयांचे 25,546,186 इक्विटी शेअर जारी करणार आहे. 

कंपनीला आयपीओ आणण्यासाठी स्टॉक मार्केट रेग्युलेटर सेबीकडून (Securities and Exchange Board of India) आधीच मंजुरी मिळाली आहे. कंपनीने जुलै 2022 मध्ये आपला आयपीओ लॉन्च करण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर (DRHP) दाखल केला होता. सुला वाईनयार्ड्सचे शेअर्स बीएसई (BSE) आणि एनएसईवर (NSE) लिस्ट केले जातील.

2021-22 मध्ये सुला वाईनयार्ड्सचा रेव्हेन्यू 453.92 कोटी रुपये होता तर नफा 52.14 कोटी रुपये होता. 2020-21 मध्ये रेव्हेन्यू 417.96 कोटी रुपये होता आणि नफा 3.01 कोटी रुपये होता. 1996 कंपनीची स्थापना झाली. सुला वाईनयार्ड्स 13 ब्रँडच्या नावाखाली 56 प्रकारच्या लेबल केलेल्या वाईनचे उत्पादन करते. ही कंपनी वाईन मार्केटमधील दिग्गजांपैकी एक आहे. कंपनीचे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये चार मालकीचे आणि दोन भाडेतत्त्वावरील प्लांट आहेत. कंपनीचे दोन वाईन रिसॉर्टही नाशिकमध्ये आहेत.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगव्यवसायशेअर बाजार