Join us

सुंदर पिचाईंची सॅलरी सामान्य कर्मचाऱ्याच्या ८०० पट, कंपनीचा खुलासा; जानेवारीत १२ हजार जणांना दिला होता नारळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 10:40 AM

गुगल ऑफिसमध्ये खर्च कमी करण्याच्या विविध उपायांवर काम करत असून जानेवारीमध्ये १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती.

गुगलची (Google) मूळ कंपनी अल्फाबेटचे (Alphabet) सीईओ सुंदर पिचाई यांनी २०२२ मध्ये सुमारे १९ अब्ज रुपयांची कमाई केली. स्टॉक अवॉर्ड्सच्या रूपानं त्यांना यातील बहुतेक हिस्सा मिळाला. कंपनीनं एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये सुंदर पिचाई यांना २२६ मिलियन डॉलर (१८५४ कोटी रुपये) वेतन मिळालं आहे. कंपनीत काम करणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्याच्या उत्पन्नापेक्षा हे ८०० पट अधिक आहे. विशेष म्हणजे या वर्षी जानेवारीमध्ये गुगलनं १२ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता.

वृत्तानुसार सुंदर पिचाई यांना अनेक उत्पादनांचं यशस्वी लाँच आणि सीईओ पदावर बढती दिल्याबद्दल ही मोठी रक्कम पगार म्हणून देण्यात आली आहे. त्यांना देण्यात आलेल्या २१८ मिलियन डॉलर्सच्या म्हणजेच १७.८८ अब्ज रुपयांच्या स्टॉक अवॉर्डमुळे त्यांचं वेतन इतकं दिसत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. पिचाई यांच्या नेतृत्वाखाली Google नं त्यांच्या प्रमुख जाहिराती आणि YouTube व्यवसायातून नफा कमावला. यावेळी कंपनीने मशीन लर्निंग, हार्डवेअर आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्येही गुंतवणूक केली आहे. सुंदर पिचाई हे सर्वाधिक वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये आहेत. भारतीय वंशाच्या पिचाई यांनी आयआयटी खडगपूरमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आणि ते अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले.

मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातगुगलनं जानेवारी महिन्यात १२ हजार लोकांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला. त्याचा परिणाम जगभरातील गुगलच्या कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर झाला. याशिवाय गुगल ऑफिसमध्ये खर्च कमी करण्याच्या विविध उपायांवर काम करत आहे. कंपनीसाठी हा कठीण पण योग्य निर्णय आहे. पुढील रणनीती लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतल्याचं पिचाई यांनी नमूद केलं होतं.

टॅग्स :गुगलसुंदर पिचई