नवी दिल्ली : भारतात दरवर्षी १५ लाख तरुण अभियांत्रिकी क्षेत्रात पदवीधर होऊन बाहेर पडतात; पण यातील केवळ २.५ लाख विद्यार्थ्यांना त्यांच्या तंत्रज्ञानाशी सुसंगत नोकरी मिळते. तसेच केवळ ३ टक्के पदवीधरांनाच चांगले म्हणजेच वार्षिक ८ लाख रुपयांपेक्षा जास्त वेतन मिळते. एडटेक स्टार्टअप संस्था ‘स्केलर’ने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. बहुतांश नवपदवीधर अभियंत्यांना वार्षिक ३ ते ५ लाख रुपये वार्षिक वेतनावर काम करावे लागते, असेही या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.
अहवालात म्हटले आहे की, सर्वाधिक २.२ लाख अभियंते सॉफ्टवेअर क्षेत्रात जातात. तथापि, त्यांना अपेक्षित वेतन मिळत नाही. त्यांना वार्षिक ३ ते ५ लाखांच्या वेतनावरच राबवून घेतले जाते. दरवर्षी पदवीधर होणाऱ्या १५ लाख अभियंत्यांपैकी फक्त ४० हजार पदवीधरांनाच ८ ते १० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळते. एकूण पदवीधरांच्या तुलनेत हे प्रमाण अवघे ३ टक्के आहे. उच्च पॅकेज मिळविणारे हे तरुण अभियंते टिअर-१ महाविद्यालयातून आलेले असतात. टिअर-२ आणि टिअर-३ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळत नाहीत. अहवालात म्हटले आहे की, उद्योगांना थेट उपयोगी पडेल, अशा कौशल्याचा अभाव ही नवपदवीधरांची मुख्य समस्या आहे. याशिवाय संधींची असमानता हेही एक कारण आहे. १२.५ लाख अभियंत्यांना बिगर-तंत्रज्ञानात्मक संधी स्वीकाराव्या लागतात. हे तरुण मिळेल त्या नोकºया करतात. ते जे काम करतात, त्याचा त्यांच्या शिक्षणाशी बरेचदा संबंधच नसतो. छोट्या शहरांतील महाविद्यालयांमधून बाहेर पडलेल्या पदवीधरांची स्थिती अधिक बिकट आहे.काही क्षेत्रांत विशेष कौशल्ये असण्याची गरजसुसंगत कौशल्याचा अभाव हा मुख्य मुद्दा अहवालात मांडण्यात आला असतानाच काही महत्त्वपूर्ण क्षेत्रांना विशेष कौशल्याची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. डाटा सायन्स, मशीन लर्निंग/कृत्रिम बुद्धिमत्ता, मोबाईल डेव्हलपमेंट, फूल-स्टॅक डेव्हलपमेंट आणि बॅक-एंड डेव्हलपमेंट यांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, याआधी ‘कोरसेरा’ने जारी केलेल्या एका अहवालानुसार, आगामी काळात बिझनेस, टेक्नॉलॉजी आणि डाटा सायन्स कौशल्ये अधिक महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. जगभरात हाच कल आहे. विशेषत: साथ पश्चात काळात या क्षेत्रांना महत्त्व येणार आहे. ‘लिंकेडइन’ने केलेल्या दाव्यानुसार, साथ काळात भारतीय अभियंते स्वत:ची कौशल्य अद्ययावत करू इच्छित आहेत.