Join us

आर्थिक धक्क्यातून सावरले अतिश्रीमंत; गाेरगरीब अजूनही गाळात रुतलेलेच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2023 10:23 AM

देशातील २० टक्के सर्वाधिक श्रीमंत लोक लवकर सावरले आहेत किंवा त्यांच्यावर महामारीचा काहीही परिणाम झालेला नाही, असे समोर आले आहे.

गेल्या वर्षभरात लक्झरी कार व इतर वस्तूंची प्रचंड विक्री झाली. त्यातून कोविड-१९ साथीच्या धक्क्यातून देशातील २० टक्के सर्वाधिक श्रीमंत लोक लवकर सावरले आहेत किंवा त्यांच्यावर महामारीचा काहीही परिणाम झालेला नाही, असे बचत व खर्च यावर काम करणाऱ्या संस्थांच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

मार्केट डेटानुसार, मागील एक वर्षात लक्झरी गाड्यांची विक्री ५० टक्के वाढली आहे. महागडे स्मार्टफोन, मोठे टीव्ही, फ्रीज यांची विक्री ५५ ते ९५ टक्के वाढली आहे. स्वीस घड्याळांची विक्री वाढून दुप्पट झाली आहे. 

याउलट टूथपेस्ट, केशतेल, साबण यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीचा वृद्धीदर अजूनही नकारात्मक आहे. कमी उत्पन्न असलेल्या लोकांत विकल्या जाणाऱ्या स्वस्त मोबाइलची विक्री कमीच आहे. दुचाकी वाहनांची विक्री वाढलेली नाही.

लक्झरी वस्तूंची विक्री वाढली

  • २०२२ मध्ये लक्झरी कारची विक्री ५०% वाढून ३७,००० गाड्यांवर गेली. यातील दहा हजार कारची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. 
  • मर्सिडिस बेंझने सर्वाधिक ६,५०० कार विकल्या. ४१ हजार रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या मोबाइलची विक्री २०२२ मध्ये ५५ टक्के वाढली. १६४० कोटी रुपयांची विक्री स्वीस घड्याळांची झाली. 
  • २०२० मध्ये ती ८४३ कोटी रुपये होती. ९५% वाढली ५५ इंचापेक्षा मोठ्या टीव्हीची विक्री. 
  • तळागाळातले धक्क्यातच
  • बाजार उघडताच अतिश्रीमंतांनी धडाक्यात खरेदी केली. मात्र, लाेकसंख्येच्या तळातला २० टक्के हिस्सा अजूनही सावरलेला नाही. या गटातील गरीब व मध्यमवर्गीय लाेक अजूनही जरा विचार करूनच आवश्यक वस्तूंची खरेदी करत आहेत. 
  • या लाेकांना सावरण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागू शकताे. त्याचवेळी लक्झरी उत्पादनांच्या विक्रीलाही ब्रेक लागू शकताे, असा अंदाज आहे.  

गरिबांचा खिसा रिकामाच

  • टूथपेस्ट,  नूडल्स, हेअर ऑइल इत्यादी वस्तूंची विक्री ०.२ टक्क्यांनी घटली आहे. ग्रामीण व निमशहरी भागात घसरणीचे प्रमाण ०.८ टक्के आहे. 
  • सियामच्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२० मध्ये १३.४० लाख दुचाकींची विक्री झाली, तर जानेवारी २०२३मध्ये आकडा १३.१८ लाख हाेता. दुचाकींची विक्री वाढलेली नाही.
  • याच कालावधीत प्रवासी कारच्या विक्रीत २३ टक्के वाढ झाली आहे.
  • २५ हजारांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफाेन्सची विक्री १५%नी घटली आहे.
टॅग्स :पैसाकारस्मार्टफोन