नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने भारतात उपग्रहावर आधारित ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी परवाना मागितला आहे. भारतात यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे.
इलॉन मस्क यांची स्पेसएक्स ही कंपनी ‘स्टारलिंक’ या ब्रँडच्या नावाने उपग्रहाधिष्ठित ब्रॉडबँड सेवा देते. जीएमपीसीएस परवान्यासाठी अर्ज करणारी स्टारलिंक ही तिसरी कंपनी आहे. भारताच्या स्पेस इंटरनेट क्षेत्रात स्टारलिंकचा प्रवेश झाल्यामुळे एअरटेल, जिओ आणि ॲमेझॉन यांना तगडी स्पर्धा निर्माण होईल.
गेल्या वर्षी काय झाले?
स्टारलिंकने भारतात आपली उपग्रह ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यासाठी गेल्या वर्षी प्रयत्न केले होते. मार्च, २०२१ मध्ये कंपनीने प्री-बुकिंग सुरू केले होते. भारतीय दूरसंचार नियामकीय प्राधिकरणाकडे (ट्राय) परवानगीही मागितली होती. नोव्हेंबर, २०२१ मध्ये दूरसंचार विभागाने यात हस्तक्षेप केल्यामुळे स्टारलिंकची योजना बारगळली होती. दूरसंचार विभागाच्या आदेशानंतर कंपनीने प्री-बुकिंगचे ९९ डॉलर (७,५०० रुपये) ग्राहकांना १ डिसेंबर, २०२१ पर्यंत परत केले होते.
अनेक परवान्यांची गरज
भारतात सॅटेलाइट बेस्ड ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी जीएमपीसीएस परवान्याशिवाय इतरही काही मंजुरींची आवश्यकता आहे.