नवी दिल्ली : कापसाचे भाव बाजारपेठेत चढत गेल्यामुळे अडचणीत सापडलेल्या सूतगिरण्यांना मदत करण्यासाठी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)ने पुढाकार घेतला आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून हमी भावाने घेतलेला कापूस आता सूतगिरण्यांना पुरवण्याचा निर्णय महामंडळाने घेतल्यामुळे सुक्ष्म, लघु व मध्यम प्रवर्गात मोडणाऱ्या अनेक सूतगिरण्यांना बाजारपेठेपेक्षा स्वस्त दराने कापूस उपलब्ध होणार आहे.वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाजारपेठेत महाग दराने उपलब्ध कापूस आणि उत्पन्नाचे प्रमाण कमी यामुळे देशातल्या अनेक सूतगिरण्या एकतर बंद पडल्या होत्या अथवा मंदगतीने उत्पादन करीत होत्या. मे महिन्यात बाजारपेठेत कापसाचे भाव ३५६ किलोच्या गाठींसाठी ३५ हजार रूपयांपर्यंत पोहोचले होते. तथापि मे महिन्यापर्यंत कापूस महामंडळाने शेतकऱ्यांकडून ८ लाख ४0 हजार गाठी कापूस खरेदी केला होता. हमी भावाच्या खाली कापसाची किंमत गेल्यावरच महामंडळ कापूस खरेदी करते. महामंडळाकडून हा स्वस्त कापूस उपलब्ध होणार असल्याने सूतगिरण्यांना नव्याने संजीवनी प्राप्त होणार आहे.कापसाचे भाव बाजारपेठेत चढत गेल्यामुळे केंद्र सरकारने मध्यंतरी एक बैठक आयोजित केली होती. बैठकीत सूतगिरण्यांच्या समस्येबरोबर कापूस उत्पादनाच्या स्थितीचाही आढावा घेण्यात आला. गतवर्षी देशात ३.६0 लाख टन गाठी कापसाच्या उत्पादनाची अपेक्षा असतांना प्रत्यक्षात उत्पादन झाले फक्त ३.२५ लाख गाठींचे. उत्पादन कमी असतांनाही कापूस निर्यातीवर बंधने नव्हती. (वृत्तसंस्था)
आजारी सूतगिरण्यांना मिळणार आधार!
By admin | Published: July 19, 2016 4:40 AM