नवी दिल्ली : आयकर रिटर्नमध्ये परदेशात असलेली मालमत्ता किंवा परदेशात कमावलेले उत्पन्न जाहीर न केल्यास १० लाख रुपयांचा दंड होऊ शकतो, असा इशारा आयकर विभागाने दिला आहे. काळा पैसाविरोधी कायद्यानुसार हा दंड आकारला जाईल. उशिरा आणि सुधारित आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने शनिवारी कंप्लाइन्स-कम-अवेअरनेस मोहिमेतून करदात्यांना सार्वजनिक सल्लापत्र जारी केले.
यात करदात्यांनी या मूल्यांकन वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्नमध्ये अशी माहिती प्रविष्ट करावी आणि कोणत्याही प्रकारची माहिती लपवू नये यावर जोर देण्यात आला आहे. या अंतर्गत ठरवलेल्या काही करसंबंधित बाबींमध्ये त्यांचा सहभाग असेल तसेच त्यावर भारतात करदायित्व असल्यास ते आयटीआरमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे. या निकषांतर्गत येणाऱ्या करदात्यांना आयटीआरमध्ये परदेशी मालमत्ता किंवा परदेशी स्त्रोत उत्पन्न शेड्यूल भरणे अनिवार्य आहे. आयटीआरमध्ये परकीय मालमत्ता/उत्पन्न जाहीर न केल्यास काळा पैसा आणि कर आकारणी कायदा, २०१५ अंतर्गत १० लाखांचा दंड आकारला जाऊ शकतो.
‘हे’ लपविल्यास फटका
परदेशी मालमत्तेमध्ये बँक खाती, रोख मूल्य, विमा करार किंवा वार्षिक करार, संस्था किंवा व्यवसायातील आर्थिक हितसंबंध, रिअल इस्टेट, इक्विटी आणि कर्जाचे व्याज, एखाद्या ट्रस्टचे विश्वस्त, सेटलरचे लाभार्थी, कस्टोडिअल खाती, परदेशात असलेली कोणतीही भांडवली नफा मालमत्ता आदीं समाविष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे.