Supreme Court On Byju's : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या Byju's ला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. बायजू रवींद्रन यांच्या नेतृत्वाखालील कंपनीविरोधात दिवाळखोरीची कारवाई बंद करण्याचा राष्ट्रीय कायदा न्यायाधिकरणाचा (NCLT) आदेश न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने हा आदेश दिला आहे.
158.9 कोटी रुपयांच्या थकबाकीवर सुप्रीम कोर्टाने काय म्हटले?
सुप्रीम कोर्टाने NCLT चा आदेश रद्द केला, ज्यात Byju's ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सोबत 158.9 कोटी रुपयांची थकबाकी सोडवण्यास मान्यता देण्यात आली होती. (माहितीसाठी- तुम्ही टीम इंडियाच्या जर्सीवर Byju's चा पाहिला असेल. यापूर्वी ओप्पोचा लोगो टीम इंडियाच्या जर्सीवर दिसायचा, जो 2019 मध्ये बदलून Byju's चा करण्यात आला. पण, बीसीसीआयसोबत Byju's चा करार मार्च 2023 मध्ये संपला होता.)
अमेरिकन कंपनीच्या याचिकेवर सुनावणी
NCLT च्या आदेशाविरोधात अमेरिकन कंपनी ग्लास ट्रस्ट कंपनी एलएलसीच्या याचिकेवर न्यायालयाने बुधवारी हा निर्णय दिला. आदेशात म्हटले आहे की, क्रिकेट नियामक मंडळाला 158.9 कोटी रुपयांची सेटलमेंट रक्कम कर्जदारांच्या समितीकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खंडपीठाने सांगितले की, वेगळ्या एस्क्रो खात्यात ठेवलेल्या सेटलमेंटची रक्कम कर्जदारांच्या समितीच्या एस्क्रो खात्यात जमा करावी लागेल.
कंपनीचे मूल्य 22 अब्ज डॉलर्सवरुन 0 वर आले
एडटेक कंपनी Byju's चे मूल्य 2022 पर्यंत 22 अब्ज डॉलर्स होते, जे आता शून्य झाले आहे. कंपनीचे फाऊंड बायजू रवींद्रन यांनी नुकत्याच एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती. गुंतवणूकदार गेल्यानंतर कंपनीचे पैसे संपले आणि हळूहळू कंपनी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, असे ते म्हणाले होते. मात्र, आम्ही लवकरच परत येऊ, असा विश्वासही रवींद्रन यांनी व्यक्त केला.
Byju's च्या पडझडीची कारणे
एकेकाळी एडटेक क्षेत्रात Byju's चा बोलबाला होता. पण, हळुहळू कंपनी जमिनीवर आली. यामागे अनेक कारणे आहेत. यातील पहिली बाब म्हणजे कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या काळात ऑनलाइन शिक्षणाची मागणी शिगेला पोहोचली होती, परंतु कोरोना दूर होताच ही मागणी कमी होऊ लागली. याशिवाय, कंपनीने अनेक अधिग्रहण केले, ज्यामुळे त्याच्या कर्जाचा बोजा वाढत गेला. तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे, कंपनीची स्थिती बिघडायला लागल्यावर एकापाठोपाठ एक मोठे गुंतवणूकदार कंपनी सोडून जाऊ लागले. या कारणांमध्ये कंपनी डबघाईला आली.