Join us

'इतक्या सहजासहजी माफ करणार नाही', पतंजली प्रकरणात कोर्टाने IMA अध्यक्षांना फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 18:42 IST

पतंजली प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने IMAचे अध्यक्ष डॉ.अशोकन यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आणि त्यांनी न्यायालयात येण्यापूर्वी जाहीर माफी का मागितली नाही, अशी विचारणा केली.

Supreme Court: बाबा रामदेव यांच्या पतंजली प्रकरणात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चे अध्यक्ष डॉ. आर.व्ही. अशोकन यांना सुप्रीम कोर्टाने मंगळवारी (14 मे) फटकारले आहे. एका मीडिया हाउसला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या काही टिप्पण्यांबद्दल कोर्टाने नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती अमानुल्ला म्हणाले की, पतंजलीच्या संस्थापकांनी जे केले, तेच IMA अध्यक्षांनीही केले. त्यांनी त्यांची वृत्ती दुर्दैवी असल्याचे वर्णनही न्यायमूर्तींनी केले. 

IMA अध्यक्षांच्या मुलाखतीबाबत पतंजलीचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. विशेष म्हणजे, न्यायमूर्ती अमानुल्ला यांनी IMA अध्यक्ष डॉ.अशोकन यांना फटकारले तेव्हा ते न्यायालयातच हजर होते. दरम्यान, पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनाही यापूर्वी फटकारले होते. 

मीडिया रिपोर्टनुसार, IMA अध्यक्ष डॉ. अशोकन यांनी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठासमोर बिनशर्त माफी मागितली. मात्र, खंडपीठ त्यांच्या या वृत्तीवर खूश नव्हते. न्यायमूर्ती कोहली म्हणाले, डॉ. अशोकन, तुमच्या अनुभवाच्या आधारे आम्हाला तुमच्याकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा आहे. तुम्ही मीडियाला मुलाखत दिली, त्यावर आम्ही अजिबात खुश नाही. आम्ही इतक्या सहजासहजी माफ करणार नाही. त्याचवेळी न्यायमूर्ती अमानुल्ला यांनी त्यांना फटकारले आणि सांगितले की, पतंजलीच्या संस्थापकांनी जे केले, तेच तुम्हीही केले.

टॅग्स :पतंजलीसर्वोच्च न्यायालयरामदेव बाबाव्यवसाय