नवी दिल्ली: कोरोना काळातही फार्मा, औषध उत्पादक क्षेत्रातील अनेकविध कंपन्यांनी अविरत सेवा सुरू ठेवली. त्यामुळे या कंपन्यांची कामगिरी अधिकाधिक उंचावल्याचे पाहायला मिळाले. यातच आता फार्मा क्षेत्रातील एका कंपनीने शेअर मार्केटमध्ये IPO सादर करणार असल्याची घोषणा केली आहे. आयपीओच्या माध्यमातून ७०० कोटी उभारण्याची योजना कंपनीने आखली आहे.
अॅक्टिव्ह फार्मा इंग्रिडिएंट्स उत्पादन करणारी आघाडीची कंपनी सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेडने IPO जाहीर केला असून, १६ डिसेंबर २०२१ पासून खुला होणार आहे. या योजनेत प्रत्येक इक्विटी समभागासाठी २६५ रुपये ते २७४ रुपये इतकी किंमत निश्चित करण्यात आली आहे. यासाठी बोली लावताना किमान ५४ इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर ५४ च्या पटीत अर्ज करता येणार आहेत.
बीएसई-एनएसई दोन्ही ठिकाणी नोंदणी करण्याचा प्रस्ताव
इक्विटी समभागांची मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) या दोन्ही ठिकाणी नोंदणी करण्याचा प्रस्ताव आहे. या कंपनीकडून ७०० कोटी रुपयांपर्यंतचा निधी उभारण्याची योजना आहे. यामध्ये कंपनीतर्फे सुमारे २०० कोटींच्या नवीन समभागांचा समावेश असून सुमारे ५०० कोटींपर्यंतचे समभाग सतीश वाघ यांच्यातर्फे विक्री योजनेअंतर्गत उपलब्ध होत आहेत. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे जाहीर करण्यात आली असून, त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना वाटपासाठी ७५ टक्क्यांपेक्षा कमी नसलेले समभाग उपलब्ध होतील.
दरम्यान, कंपनी आणि प्रवर्तक विक्रेता समभागधारक बीआरएलएमशी सल्लामसलत करून QIB हिश्शातील ६० टक्क्यांपर्यंतचे समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना वाटपासाठी उपलब्ध करू देईल. योजनेच्या किमान १५ टक्के हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांना प्रमाणित तत्त्वावर वाटपासाठी उपलब्ध असेल. ऑफर किंमतीच्या समकक्ष किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीला मागणी आल्यासच हे हिस्सा वाटप केले जाईल, असे सांगण्यात आले आहे.