Join us

Video कॉलने ९० वर्षीय आजोबांच्या आयुष्यात वादळ! आयुष्यभरात कमावलेले १.१५ कोटी गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 16:52 IST

digital arrest cyber crime : सुरत येथील एका ९० वर्षीय आजोबांना आलेल्या व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप कॉलने त्यांचे आयुष्य उध्वस्त केलं आहे. या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

digital arrest cyber crime : एका ९० वर्षीय आजोबांच्या आयुष्यात एका फोन कॉलने वादळ निर्माण झालंय. गुजरात राज्यातील सुरतमध्ये घडलेल्या या घटनेनंतर राज्यभर खळबळ उडाली आहे. या घटनेत वृद्ध व्यक्तीने तब्बल १ कोटी १५ लाख रुपये गमावले आहेत. आयुष्यभर कष्ट पै पे जमवलेली रक्कम एका झटक्यात गेली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती मिळत आहे.

सुरत क्राईम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार, या फसवणुकीप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण एका चिनी टोळीसोबत काम करत होते. मुख्य आरोपी पार्थ गोपानी हा अद्याप फरार असून तो कंबोडियात असल्याचे समजते. उपपोलीस आयुक्त (डीसीपी) भास्कर रोजिया यांनी सांगितले की, हा ज्येष्ठ नागरिक शेअर मार्केटमध्ये पैसे गुतवत होते. दरम्यान, त्यांना एक व्हॉट्सअ‍ॅप कॉल आला. यामध्ये पोलिसाचे कपडे घातलेला एक अधिकारी दिसत होता. त्याने तो सीबीआय अधिकारी असल्याची ओळख करुन दिली. मुंबईहून चीनला त्यांच्या नावाने पाठवलेल्या पार्सलमध्ये ४०० ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडल्याचे आजोबांना सांगण्यात आले.

एवढेच नाही तर त्यांच्या बँक तपशीलातून ते मनी लाँड्रिंगमध्ये गुंतल्याचंही सांगण्यात आलं. तुमच्यावर गुन्हा दाखल होणार असून सर्वांना खडी फोडायला पाठवतो, अशी धमकी देण्यात आली. चौकशीच्या बहाण्याने त्यांनी या वृद्ध व्यक्तीला १५ दिवस डिजिटल अटकेत ठेवले. या १५ दिवसांत ते वारंवार बँक खात्यातील व्यवहारांची चौकशी करत होते. यानंतर आरोपीने त्यांच्या खात्यातून १.१५ कोटी रुपये ट्रान्सफर केले.

पाच आरोपींना अटकया घटनेची माहिती कुटुंबियांना कळताच त्यांनी २९ ऑक्टोबर रोजी सूरत सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितले की, पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य आरोपी गोपानीचा शोध सुरू आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून ४६ डेबिट कार्ड, २३ चेकबुक, एक वाहन, ४ वेगवेगळ्या कंपन्यांचे रबर स्टॅम्प, नऊ मोबाईल फोन आणि २८ सिमकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रमेश सुराणा, उमेश जिंजाळा, नरेश सुराणा, राजेश देवरा आणि गौरांग रुखोलिया यांचा समावेश आहे.

टॅग्स :सायबर क्राइमगुन्हेगारीधोकेबाजीगुजरात