हैदराबाद : रेल्वेच्या मालवाहतूक क्षेत्रात सुधारणा होत असून, रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे लवकरच मालवाहतुकीचे दर कमी केले जातील. रेल्वेच्या उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम होईल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले. नागलपल्ली आणि तुघलकाबाद या मार्गावर धावणाऱ्या एका वेळापत्रकाधिष्टित कंटेनर रेल्वेला सिकंदराबाद रेल्वेस्थानकावर प्रभू यांनी सोमवारी हिरवी झेंडी दाखविली. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रभू म्हणाले की, आपल्या देशात निर्धारित वेळापत्रकानुसार मालगाड्या चालत नाहीत. त्यामुळे वाहतूक केल्या जाणाऱ्या मालाचा मोठा हिस्सा रेल्वेकडे येतच नाही. रेल्वेने पाठविलेला माल केव्हा पोहोचेल हे कोणालाच माहिती नसते. हे बदलण्यासाठी आम्ही विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. वेळापत्रकाधिष्ठित मालगाड्यांच्या दोन जोड्या ‘कार्गो एक्स्प्रेस’ या नावाने आम्ही यापूर्वीच सुरू केल्या आहेत. या गाड्या निर्धारित वेळेआधीच स्थानकावर पोहोचत आहेत. प्रभू म्हणाले की, वास्तविक रेल्वेच्या एकूण उत्पन्नापैकी दोन तृतियांश उत्पादन मालवाहतुकीतून येते. तरीही आम्ही त्याकडे लक्ष दिले नाही. मालवाहतुकीतील रेल्वेचा वाटा घसरत आहे. येणाऱ्या दिवसांत ही रेल्वेच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या इतिहासात आम्ही यंदा प्रथमच रेल्वे अर्थसंकल्पात मालवाहतुकीचे भाडे कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. रेल्वे मालवाहतुकीच्या सुधारणा क्रांतिकारक ठरतील. प्रभू म्हणाले की, रेल्वे ही भारतातील सर्वांत मोठी ऊर्जा वापरणारी संस्था आहे. ऊर्जेवर रेल्वेचा मोठा खर्च होतो. तो कमी करण्यासाठी विजेचा वापर योग्य प्रकारे करावा लागेल. अनेक उपाययोजना कराव्या लागतील. आम्ही त्या हातीही घेतल्या आहेत. रेल्वेच्या अस्तित्वासाठी रेल्वेचा ऊर्जेवरील खर्च कमी करावाच लागेल. (वृत्तसंस्था)
मालवाहतुकीचे दर कमी करणार- सुरेश प्रभू
By admin | Published: August 09, 2016 3:34 AM