Join us

ब्लॅक मनीवर सर्जिकल स्ट्राईक! 'लोक जमा करत होते २ हजारांच्या नोटा,' RBI चे माजी डिप्टी गव्हर्नर म्हणाले… 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 1:56 PM

२ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी अचानक जाहीर केला.

२ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी अचानक जाहीर केला. या नोटा बदलून घेण्यास अथवा बँकेत जमा करण्यास नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यावर रिझर्व्ह बँकेचे माजी डिप्टी गव्हर्नर आर. गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्यामुळे काळ्या पैशावर लगाम घालण्यास बऱ्याच प्रमाणात मदत होईल. लोक या नोटा जमा करून ठेवत होते, असंही ते म्हणाले.

२०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या, त्यावेळी वेळी गांधी आरबीआयच्या चलन विभागाचे प्रमुख होते. दरम्यान, २ हजारांच्या नोटा चलनातून मागे घेतल्याचा पेमेंटवर कोणताही पद्धतशीर परिणाम होण्याची शक्यता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कारण या नोटा दैनंदिन पेमेंटसाठी वापरल्या जात नाहीत. बहुतांश पेमेंट डिजिटल माध्यमातून केलं जातं. दरम्यान, नोटा बदलण्यासाठी एका वेळी २० हजार रुपयांची मर्यादा गैरसोयीची ठरू शकते. काही लोकांना नोटा बदलण्यासाटी बँकेच्या शाखेत अनेकदाही जावं लागू शकतं.

अर्थव्यवस्थेवर परिणाम नाही

निर्णयाच्या घोषणेनंतर एका टीव्ही चॅनलशी वित्त सचिव टी व्ही सोमनाथ यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी या निर्णयावर भाष्य केलं. हा निर्णय नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या नोटाबंदीपेक्षा वेगळा आहे. तसेच त्याचा अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. ३० सप्टेंबरपर्यंत नोटा जमा  न होणाऱ्या नोटांबद्दलही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यासंदर्भात बँकांकडे योग्य ती व्यवस्था असेल असं उत्तर त्यांनी दिलं.

३० सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार

RBI नं क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत २ हजार रुपयांची नोट चलनातून बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयनं लोकांना नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत वेळ दिली आहे. २३ मे ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत लोक बँकेत जाऊन २००० रुपयांच्या नोटा बदलू शकतील.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकसरकारब्लॅक मनी