नवी दिल्ली : उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा देण्यापाठोपाठ सुरजित भल्ला यांनीही मंगळवारी पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचा राजीनामा दिला.पटेल यांनी सोमवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद सोडले होते. भल्ला यांनी काही वाहिन्यांवर पटेल यांच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. त्यांनी अशी प्रतिक्रिया का दिली? याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती. अशातच भल्ला यांनी स्वत:हून टिष्ट्वटद्वारे परिषदेचे सदस्यत्व सोडल्याचे जाहीर केले. एका वृत्त वाहिनीशी संलग्न झाल्याने तसेच १९५२ च्या निवडणुकांसंबंधी पुस्तकाचे लेखन करायचे असल्याने आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी टिष्ट्वटवर स्पष्ट केले.पंतप्रधान मोदी यांची साथ सोडणारे भल्ला हे मागील १५ महिन्यांतील चौथे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत. याआधी निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढीया यांनी आॅगस्ट २०१७ मध्ये राजीनामा दिला होता. जून २०१८ मध्ये मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता उर्जित पटेल आणि सुरजित भल्ला यांनी स्वत:ला केंद्र सरकारपासून दूर केले आहे.
सुरजित भल्ला यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 1:41 AM