नवी दिल्ली : देशभरातील एकूण श्रमबळापैकी नोकरदारांच्या संख्येत अलीकडे सातत्याने घट होत आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये नोकरदारांची एकूण संख्या २१.५ टक्के होती, ती २०२२-२३ मध्ये कमी होत २०.९ टक्के झाली. दुसरीकडे, तरुण वर्ग नोकरीपेक्षा स्वयंरोजगाराकडे वळल्याचेही दिसते.
२०२१-२२ मध्ये स्वयंरोजगार करणाऱ्यांची संख्या ५५.८ टक्के होती, ती २०२२-२३ मध्ये ५७.३ टक्क्यांवर गेली आहे. तसेच, एकीकडे नोकरी करणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी दुसरीकडे त्यांच्या पगारात मात्र चांगली वाढ झाल्याचे दिसून येते. केंद्र सरकारच्या ‘पिरिऑडीक लेबर फोर्स सर्व्हे’ने ही ताजी आकडेवारी जारी केली आहे.
२०२२-२३ या वर्षात देशातील २१ पैकी १२ राज्यांमध्ये नोकरदारांची संख्या घटली आहे. सर्वाधिक घट आसामात (८.७ टक्के) नोंदवण्यात आली आहे. त्यापाठोपाठ सिक्कीमचा (७.८) क्रमांक लागतो. तथापि, २०२२-२३ मध्ये नोकरदारांच्या पगारात चांगली सरासरी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.