नवी दिल्ली - देशातील आर्थिक मंदीमुळे बरोजगारी वाढत असून नवीन नोकऱ्यांच्या संधीचे प्रमाणही कमी झाले आहे. देशात ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत केवळ 19 टक्के कंपन्याच नवीन नोकऱ्या देऊ शकणार आहेत. एका जागतिक सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे. या सर्वेक्षणामध्ये 5131 कंपन्यांच्या मालकांशी संवाद साधण्यात आला होता. त्यामध्ये, उपलब्ध नवीन नोकऱ्या आणि आर्थिक मंदीविषयक चर्चा करण्यात आली आहे.
देशातील 52 टक्के कंपन्यांना आपल्या कार्यपद्धतीत कुठल्याही बदलाची अपेक्षा नाही. तर, ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत केवळ 19 कंपन्यांकडूनच नवीन नोकरी उपलब्ध करून दिल्या जाण्याची शक्यता आहे. मॅनपॉवर ग्रुप एम्प्लॉयमेंट आऊटलुक या जागतिक स्तरावरील संस्थेमार्फत एक सर्वेक्षण करण्यात आले. त्याचा अहवाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात जवळपास 5131 कंपन्यांशी संपर्क करण्यात आला होता. त्यामध्ये केवळ 19 टक्के कंपन्यांनी नोकरभरतीची शक्यता वर्तवली आहे. तर 52 टक्के कंपन्यांनी कुठल्याही नोकरभरतीची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले. उर्वरीत 28 टक्के कंपन्यांनी सद्यस्थितीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याबाबत सध्या काहीही सांगता येत नसल्याचे म्हटले आहे.
पुढील तीन महिन्यात नवीन नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करुन देणाऱ्या देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकाचा देश ठरेल. या यादीत जपान प्रथम क्रमांकावर, तायवान द्वितीय तर अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर असेल, अशी शक्यता आहे. जपानमध्ये 26 टक्के कंपन्यांनी नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असे सांगितले आहे. तर, तायवान 21 टक्के आणि अमेरिकेत 20 टक्के नोकऱ्या उपलब्ध होतील, असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, मॅनपॉवरने जगभरातील 44 देशांमध्ये असलेल्या 59 हजार कंपन्यांशी संपर्क साधला. त्यानुसार आगामी तीन महिन्यात 43 ते 44 देशांमधील कंपन्यांना जॉब व्हॅकन्सीची शक्यता वाटत आहे.