Join us

नव्या पासपोर्ट नियमांबाबत सुषमा स्वराज यांनी मागवल्या प्रतिक्रिया

By admin | Published: December 25, 2016 7:43 AM

पासपोर्ट बनवण्याच्या बदललेल्या नियमांबाबत स्वराज यांनी ट्वीटरद्वारे नागरिकांना प्रतिक्रिया देण्याचं आवाहन केलं

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 25 - भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट बनवण्याच्या नियमांमध्ये नुकतेच मोठे बदल करत पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सहज केली. बदललेल्या नियमांबाबत केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीटरद्वारे नागरिकांना प्रतिक्रिया देण्याचं आवाहन केलं आहे. पासपोर्ट बनवण्याच्या नियमांमध्ये आम्ही काही मोठे बदल केले आहेत. त्यावर तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला मला आवडेल असं त्यांनी ट्वीट केलं आहे.

(पाकिस्तानात जन्मलेल्याला पासपोर्टशिवाय भारतीय व्हिसा)

पासपोर्ट नियामांमध्ये बदल करण्यात आल्याची घोषणा परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.भसह यांनी केली होती. यापुर्वी  जन्मतारखेचा पुरावा म्हणून पासपोर्ट अर्जकर्त्याला जन्म दाखला जोडणे बंधनकारक होते. मात्र, आता परराष्ट्र मंत्रालयाने नियमांमध्ये बदल केलेत. त्यामुळे जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड व ई-आधार ग्राह्य धरले जाणार आहे.तसेच, महापालिका किंवा इतर सरकारी संस्थेमार्फत दिलेला जन्म दाखला, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, स्थलांतर प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, एलआयसी पॉलिसी बाँड, आदी जन्म तारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. 
 
पासपोर्ट बनवण्यासंदर्भात इतर महत्त्वाचे बदल :
पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी यापुढे अर्जदार आपल्या नावासह आई किंवा वडील किंवा पालकांचं नाव देता येईल. म्हणजेच यातील कुणाही एकाचं नावही यापुढे ग्राह्य धरलं जाईल, आई-वडील अशा दोघांचीही नावं देण्याची गरज पडणार नाही. सिंगल पॅरेंट्स असलेल्यांना या बदललेल्या नियमाचा मोठा फायदा होणार आहे.
सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे यापुढे कोणतंही अॅनेक्सेस अटेस्टेटड, शपथपत्र, नोटरी करुन देण्याची गरज नाही. सर्व अॅनेक्सेस अर्जदार स्वत: प्लेन पेपरवर लिहून पासपोर्टसाठी सादर करु शकतो.
पासपोर्टसाठी याआधी 15 अॅनेक्सेस असायचे, ते आता 15 वरुन 9 वर आणले आहेत. अॅनेक्सेस A, C, D, E, J आणि K काढून टाकण्यात आले आहेत.
अर्जदाराला यापुढे अॅनेक्सेर K किंवा कोणतंही विवाह प्रमाणपत्र सादर करावं लागणार नाही.
जर अर्जदार घटस्फोटित असेल, तर त्याला आपल्या घटस्फोटित पती किंवा पत्नीचं नाव देण्याची गरज नाही. किंबहुना, घटस्फोटत प्रमाणपत्रही सादर करण्याची गरज नाही.
अनाथ मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचे बदल परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये केले आहेत. पासपोर्टसाठी अर्ज करताना अनाथ व्यक्तींना आपला जन्मदाखला सादर करण्याची गरज नाही. मात्र, अनाथालयाच्या मुख्य व्यक्तीचं त्यासंबंधी पत्र अर्जासोबत जोडावं लागेल.
दत्तक घेतलेल्या मुलांनाही पासपोर्टसाठी अर्ज करणं सोपं जाईल. दत्तक घेतल्याचं प्रमाणपत्र सादर न करता, ज्यांनी दत्तक घेतलं आहे, त्यांच्याकडून पत्र अर्जासोबत जोडावं लागेल.
साधू, संन्यासी यांना पासपोर्टसाठी अर्ज करायचा असल्यास, ते पालकांच्या जागी आपल्या अध्यत्मिक गुरुचं नाव देऊ शकतात.
सरकारी नोकरीत असलेल्यांना आता शासकीय सेवेत असल्याचं ओळख प्रमाणपत्र किंवा एनओसी न मिळाल्यास पासपोर्ट बनवण्यात अडथळे येणार नाहीत. कारण अॅनेक्सर- ‘N’ मध्ये अर्जराद स्वत: पत्र लिहून अर्जासोबत जोडू शकतो. या बदलामुळे आता तातडीने पासपोर्ट हवा असल्यास सरकारी नोकरीत असलेल्यांना अडचणी येणार नाहीत.
(ओळखा पाहू कोण.? सेलिब्रिटींच्या पासपोर्ट फोटोजची धमाल...)