Join us

गुजरातमध्ये होणार सुझुकीची निर्मिती

By admin | Published: June 01, 2016 3:42 AM

जपानची कार उत्पादक कंपनी सुझुकी मोटर्सचा संपूर्णत: स्वत:च्या मालकीचा गुजरातमधील प्रकल्प पुढील वर्षी कार्यान्वित होणार आहे

टोकियो : जपानची कार उत्पादक कंपनी सुझुकी मोटर्सचा संपूर्णत: स्वत:च्या मालकीचा गुजरातमधील प्रकल्प पुढील वर्षी कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पावर कंपनीने १८,५00 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.सुझुकीच्या स्वत:च्या मालकीचा हा भारतातील पहिलाच प्रकल्प आहे. कंपनीच्या भारतातील शाखेला बाजूला सारून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पातून मारुती सुझुकीला गाड्या आणि सुटे भाग पुरविण्यात येणार आहेत. भारत हा कंपनीसाठी सर्वांत मोठा बाजार आहे. सुझुकी मोटार कॉर्पचे चेअरमन ओसामू सुझुकी यांनी जपानच्या दौऱ्यावर असलेले भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, नियोजित वेळापत्रकानुसार पुढील वर्षी गुजरातेतील प्रकल्प कार्यान्वित होईल. पहिल्या टप्प्यात गुजरातमधील प्रकल्पात वर्षाला २,५0,000 वाहने तयार करण्यात येतील. २0२२पासून सुझुकीचे भारतातील कार उत्पादन २ दशलक्ष युनिटवर पोहोचेल. सध्या ते १.४ दशलक्ष युनिट इतके आहे. भारतातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीमध्ये सुझुकी मोटर्सची हिस्सेदारी ५६ टक्के आहे. भारतातील अर्धेअधिक कार मार्केट या कंपनीकडे आहे. भारतातील कार बाजार २0२0पर्यंत जपान व जर्मनीला मागे टाकील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारत हा चीन व अमेरिकेनंतर तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ बनणार आहे.