Join us

सुझुकी ३५००० कोटी, डीपी वर्ल्ड ३ अब्ज डॉलर्स गुंतवणार; मित्तल सर्वांत मोठी स्टील फॅक्ट्री उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 1:48 PM

अदानी २ लाख कोटी, तर अंबानीही कार्बन फायबर फॅसिलिटी उभारणार; व्हायब्रंट गुजरातमध्ये मोठ्या घोषणा

Vibrant Gujarat Global Summit: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी गुजरातमध्ये २ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूकीची घोषणा केली आहे. अंतराळातूही दिसणारं असं विशाल एनर्जी पार्क उभारलं जाईल, असं अदानी यांनी नमूद केलं. बुधवार, १० जानेवारी रोजी अहमदाबाद येथे आयोजित 'व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट'मध्ये गौतम अदानी सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. तर सुझुकी मोटर्सनंही यावेळी राज्यात ३५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. काय म्हटलं सुझुकी यांनी?

कंपनी या वर्षाच्या अखेरीस पहिले बॅटरी इलेक्ट्रिक वाहन लाँच करणार आहे. त्याचं लाँच गुजरातपासूनच होईल. या मॉडेलची विक्री केवळ भारतातच नाही तर जपान आणि युरोपियन देशांच्या बाजारपेठांमध्येही करण्याची आमची योजना आहे. भविष्यात बीईव्ही उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनी सुझुकी मोटर गुजरातमध्ये ३५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती सुझुकी मोटर्सचे अध्यक्ष तोशीहिरो सुझुकी यांनी दिली.   

या गुंतवणुकीद्वारे येथे चौथी प्रोडक्शन लाइन तयार केली जाईल. ज्याची उत्पादन क्षमता वार्षिक २.५ लाख युनिट्स असेल. यासह, सुझुकी मोटर गुजरातची उत्पादन क्षमता सध्याच्या ७.५ लाख युनिट्सवरून वार्षिक १० लाख युनिट्सपर्यंत वाढणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मित्तल उभारणार फॅक्ट्रीव्हायब्रंट गुजरात समिट दरम्यान आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल यांनी २०२९ पर्यंत गुजरातमधील हजीरा येथे जगातील सर्वात मोठी स्टील उत्पादनाची फॅक्ट्री उभारणार असल्याची माहिती दिली. याची क्षमता वार्षिक २.४ लाख कोटी टन असेल. यासाठी गुजरात सरकारसोबत करारावर स्वाक्षरी केल्याचंही त्यांनी सांगितलं.

रिलायन्स कार्बन फायबर फॅसिलिटी उभारणार

रिलायन्स गुजरातमधील हजीरा येथे भारतातील पहिली आणि जागतिक दर्जाची कार्बन फायबर फॅसिलिटी उभारणार आहे. हरित वाढीमध्ये गुजरातला जागतिक आघाडीवर आणण्यासाठी रिलायन्स योगदान देईल, असे मुकेश अंबानी म्हणाले. २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी रिलायन्स आणि रिलायन्स फाऊंडेशन तसंच इतर अनेक भागीदारांसह गुजरातमधील शिक्षण, क्रीडा आणि कौशल्य पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून विविध ऑलिम्पिक खेळांमध्ये चॅम्पियन तयार करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

डीपी वर्ल्ड ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

मल्टीनॅशन लॉजिस्टिक कंपनी डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलेम यांनी त्यांची कंपनी गुजरातमध्ये पुढील तीन वर्षांत ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची तयारी करत असल्याची माहिती दिली. गुजरातची अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी आम्ही सहकार्य करू. कंपनी गुजरातमध्ये कंटेनर टर्मिनल उभारणार आहे. आम्ही गुजरातमध्ये तसेच भारतातील इतर राज्यांमध्ये २.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

टॅग्स :गुजरातगौतम अदानीमारुती सुझुकीगुंतवणूक