अहमदाबाद : दिवाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया बाजारात येत असतात; पण अहमदाबादेतील ‘स्वर्ण मुद्रा’ नामक मिठाईची सर कोणत्याच मिठाईला येत नाही. या मिठाईवर चक्क २४ कॅरेट सोन्याचा मुलामा चढवलेला असतो. ही मिठाई अहमदाबादेतील लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेली आहे.
‘स्वर्ण मुद्रा’ मिठाईच्या एका पीसची किंमत १,४०० रुपये आहे. तसेच तिचा किलोचा भाव तब्बल २१ हजार रुपये किलो आहे. एक किलो ‘स्वर्ण मुद्रा’ मिठाईत १५ पीस येतात. ही मिठाई ब्लूबेरी, बदाम, पिस्ते आणि क्रॅनबेरी यापासून तयार केली जाते. अहमदाबाद शहरातील ग्वालिया
एसबीआर या दुकानात ती विकली जाते. (वृत्तसंस्था)
ऑर्डरनुसार तयार होते ‘स्वर्ण मुद्रा’
ग्वालिया एसबीआर या दुकानाच्या संचालक रवीना तिलवानी यांनी सांगितले की, ‘स्वर्ण मुद्रा’ मिठाई प्रामुख्याने दिवाळीच्या निमित्तानेच तयार केली गेली आहे. तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला चांगल्या ऑर्डर येत आहेत. मागणीनुसार आम्ही मिठाई तयार करून देतो.
लखनौची ‘एक्झॉटिका’ मिठाईही आहे प्रसिद्ध
काही दिवसांपूर्वी लखनौमध्ये २४ कॅरेट सोन्याने सजविण्यात आलेली ‘एक्झॉटिका’ नावाची मिठाई प्रसिद्धीच्या झोतात आली होती. लखनौतील नैवेद्याच्या ‘छप्पन भोग’मध्ये ते विकली जात होती. २००९ मध्ये ती बनविण्यात आली होती. ही मिठाई लाेकांच्या पसंतीस उतरली.