आजकाल बहुतेक लोक जेवण ऑर्डर करण्यासाठी फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मचा वापर करतात. जर तुम्हीही फूड ऑर्डर करण्यासाठी स्विगी किंवा झोमॅटो या दोन प्लॅटफॉर्मचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या कंपन्या प्लॅटफॉर्म फी १० ते १५ रुपयांपर्यंत वाढवू शकतात.
नुकतीच केलेली २० टक्क्यांनी वाढ
स्विगी आणि झोमॅटोवर लिस्ट अनेक रेस्टॉरंट्सचं असं म्हणणं आहे की ऑनलाइन फूड एग्रीगेटर्सनं प्लॅटफॉर्म फीमध्ये नुकतीच वाढ केली होती. त्यात आता आणखी वाढवून ती १०-१५ रुपये केली जाईल. स्विगी आणि झोमॅटोनं प्लॅटफॉर्म फी २० टक्क्यांनी वाढवून ५ रुपयांवरून ६ रुपये केली आहे. यामुळे वाढत्या ऑपरेशनल कॉस्टमध्ये फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मला आपलं मार्जिन वाढवता येणार आहे.
बिझनेस स्टँडर्डनं अनेक रेस्टॉरंट्सच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या काळात प्लॅटफॉर्म फी १० ते १५ रुपयांनी वाढेल. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मकडून आकारलं जाणारं अधिक कमिशन कमी करण्याची मागणी रेस्टॉरंटनं केली असून, जागतिक बाजारपेठेच्या अनुषंगानं प्लॅटफॉर्म फी नक्कीच वाढणार आहे, असं ते म्हणाले.
युजर्सवर थेट परिणाम
प्लॅटफॉर्म शुल्काद्वारे कंपन्या थेट आपल्या युझर्सकडून पैसे कमावतात. कारण जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती झोमॅटो किंवा स्विगीकडून जेवण मागवते तेव्हा ऑर्डरवर प्लॅटफॉर्म फी आकारली जाते.
इतर डिलिव्हरी कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या जास्त कमिशनमुळे रेस्टॉरंट्स अनेकदा फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर आपल्या मेन्यूवर वाढीव किमती ठेवतात, ज्यामुळे रेस्टॉरंट्समध्ये जाण्यापेक्षा या अॅप्सवरील जेवण आपल्याला महाग पडतं.