Alcohal Home Delivery: तुम्ही खाद्यपदार्थ किंवा अन्य सामान ऑनलाइन पद्धतीनं घरी मागवतच असाल. पण आता जे लोक बिअर किंवा अन्य मद्याचं सेवन करतात, त्यांनाही काही राज्यांमध्ये ऑनलाइन सुविधा मिळू शकते. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, नवी दिल्ली, कर्नाटक, हरियाणा, पंजाब, तामिळनाडू, गोवा आणि केरळ ही राज्ये स्विगी, बिगबास्केट आणि झोमॅटोच्या माध्यमातून मद्याची होम डिलिव्हरी करण्याची तयारी करत आहेत.
सध्या हा पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्याचा विचार केला जात आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार, बिअर, वाइन आणि लो अल्कोहोल उत्पादनांची डिलिव्हरी केली जाणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.
रिपोर्टनुसार, राज्य सरकार ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि मद्य निर्मात्यांशी ऑनलाइन मद्य वितरण प्रक्रियेचे फायदे आणि तोटे यावर चर्चा करत आहे. बंगाल आणि ओडिशामध्ये या होम डिलिव्हरीला परवानगी आहे. मोठ्या शहरांच्या वाढत्या लोकसंख्येकडे पाहता ऑनलाइन माध्यमाचा अवलंब केला जाऊ शकतो, असं या अधिकाऱ्याने सांगितलं. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं, असंही त्यांनी नमूद केलं.
कोविड काळात होती परवानगी
महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड आणि आसाम मध्ये कोविड-१९ दरम्यान काही निर्बंधांसह मद्य वितरणास परवानगी देण्यात आली होती. आता राज्यांमध्ये डिलिव्हरीवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर बीअरबॉक्स हे टेक प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलं. ही कंपनी ३ ते ४ किलोमीटरच्या रेंजमध्ये मद्याची डिलिव्हरी आणि विक्री करत होती.
ओडिशा आणि बंगालमध्ये विक्री वाढली
ऑनलाइन विक्रीमुळे बंगालमध्ये विक्रीत २० ते ३० टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती मद्य अधिकाऱ्यानं दिली. विशेषत: प्रीमियम ब्रँडमध्ये विक्रीत वाढ दिसून आली आहे. ऑनलाइन डिलिव्हरीची यंत्रणा राबविणं इतकं सोपं होणार नाही. सरकारनं ही प्रणाली आणली तर केवायसीचे नियम, मर्यादा आदी निश्चित करावे लागतील.