आजकाल फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. फसवणूक करणाऱ्यांनी आता डिलिव्हरी बॉयपर्यंत जाऊन लोकांची फसवणूक केली आहे. डिलिव्हरी बॉय असल्याचं भासवून ग्राहकांची लूट केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. असाच आणखी एक प्रकार आता समोर आला आहे, जिथे एका व्यक्तीनं स्वतःला स्विगी डिलिव्हरी बॉय असल्याचं भासवून एका ग्राहकाचे हजारो रुपये लुटले. अंकुर नावाच्या एक्स युजरनं आपल्यासोबत झालेल्या फसवणूकीबाबत माहिती दिली आहे.
डिलिव्हरी बॉय असल्याचं भासवून लुटलं
अंकुर नावाच्या एका एक्स युजरने काही दिवसांपूर्वी एका स्विगी डिलिव्हरी बॉयनं आपली हजारो रुपयांची फसवणूक केल्याची पोस्ट केली होती. अंकुरनं सांगितलं की, त्याने २० जानेवारी रोजी स्विगीवरून जेवण मागवलं होतं. काही वेळानं डिलिव्हरी बॉयचा फोन आला आणि त्याने अंकुरला अपघात झाल्याचं सांगितलं. त्याला गंभीर दुखापत झाली असून पायातून रक्तस्त्राव होत असल्याचं म्हटलं. उपचाराच्या नावाखाली डिलिव्हरी बॉयनं अंकुरकडे काही पैशांची मागणी केली आणि दुसऱ्या दिवशी परत देण्याचं आश्वासन दिलं. अंकुरनं डिलिव्हरी बॉयला पैसे ऑनलाइन ट्रान्सफर केले.
पैसे ट्रान्सफर केल्यानंतर अंकुरला काही वेळानं पुन्हा फोन आला आणि डिलिव्हरी बॉयनं आणखी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितलं. यानंतर अंकुरनं स्विगीला याबाबत माहिती दिली आणि त्याची मदत करण्यास सांगितलं.
स्विगीकडून मदत मिळाली नाही
यानंतर आपण याबाबत स्विगीकडे तक्रार केली. परंतु कोणतीही मदत मिळाली नाही. तुम्ही केलेली तक्रार आम्ही आमच्या टीमकडे दिली आहे आणि या प्रकरणी आम्ही काम करत आहोत, असं त्यांनी म्हटल्याचं त्या युजरनं सांगितलं.