Join us

१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 12:04 IST

Swiggy New Service : तुम्ही अनेकदा ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी किंवा झोमॅटोवरून जेवण किंवा काही खाद्यपदार्थ मागवले असतील. पण आता स्विगीनं एका नव्या सेवेची घोषणा केली आहे.

Swiggy New Service : तुम्ही अनेकदा ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी किंवा झोमॅटोवरून जेवण किंवा काही खाद्यपदार्थ मागवले असतील. पण आता स्विगीनं एका नव्या सेवेची घोषणा केली आहे. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी आता १० मिनिटांत तुमच्या पर्यंत गरमागरम जेवण पोहोचवणार आहे. कंपनीचे सीईओ रोहित कपूर यांनी शुक्रवारी लिंक्डइन पोस्टद्वारे ही माहिती दिली. स्विगीनं बोल्ट सेवा सुरू केली आहे. यामाध्यमातून कंपनी १० मिनिटांत ग्राहकांपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवणार आहे. सध्या देशातील काही शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध होणार आहे. रोहित कपूर यांच्या पोस्टनुसार, शुक्रवारी कंपनीनं काही शहरांमध्ये बोल्ट सेवेची चाचणीही घेतली. स्विगी लवकरच आपला आयपीओ (Swiggy IPO) आणणार आहे.

'या' शहरांमध्ये सेवा मिळणार

स्विगीची बोल्ट सेवा सध्या ६ शहरांमध्ये उपलब्ध असेल. बंगळुरू, हैदराबाद, मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि पुण्यातील नागरिकांना ही सुविधा मिळणार आहे. म्हणजेच या शहरांतील लोकांना आता १० मिनिटांच्या बोल्ट सेवेचा लाभ घेता येणार आहे. बोल्ट ग्राहकांच्या दोन किलोमीटरच्या परिघात निवडक रेस्टॉरंट्समधून लवकर जेवण पोहोचवणार आहे. येत्या काळात कंपनी इतर शहरांमध्ये याचा विस्तार करण्याचा विचार करत आहे.

यावर असेल भर

ज्या पदार्थांना तयार होण्यास कमी वेळ लागतो किंवा ते लोकांमध्ये खूप लोकप्रिय असतात अशा पदार्थांवर कंपनीचा अधिक भर देणारे. आईस्क्रीम, मिठाई आणि स्नॅक्स सारख्या रेडी टू पॅक डिशवरही भर देणार असल्याचे स्विगीनं म्हटलं. दहा वर्षांपूर्वी स्विगीनं वेटिंग पीरिअड ३० मिनिटांपर्यंत खाली आणून फूड डिलिव्हरी क्षेत्रात क्रांती घडवून आणली. आता हा कालावधी आणखी कमी करत आहोत, अशी प्रतिक्रिया स्विगीच्या फूड मार्केट प्लेसचे सीईओ रोहित कपूर म्हणाले.

टॅग्स :स्विगीअन्न