Join us

Swiggy online Food Delivery : आता ऑनलाइन जेवण ऑर्डर करणं झालं महाग, इतक्या रुपयांचे लागतेय अतिरक्त शुल्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 3:37 PM

Swiggy online Food Delivery : कंपनी सध्या शेअर बाजारात उतरण्याची तयारीही करत असल्याच्या चर्चा आहेत.

Swiggy online Food Delivery : तुम्हीही ऑनलाइन जेवण ऑर्डर केल्यास आता जास्त पैसे मोजावे लागतील. फूडटेक कंपनी स्विगीने बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये फूड ऑर्डरवर २ रुपये प्लॅटफॉर्म शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. हे शुल्क केवळ खाद्यपदार्थांच्या ऑर्डरवरच आकारलं जात आहे. स्विगीच्या क्विक कॉमर्स व्हर्टिकल, इन्स्टामार्टवर दिलेल्या ऑर्डरवर शुल्क आकारलं जात नाही. याशिवाय, हे प्लॅटफॉर्म शुल्क स्विगी वन युझर्सनादेखील लागू केले जात आहे, जे पेड मेंबरशीपअंतर्गत येतं.

स्विगीच्या प्रवक्त्यानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्लॅटफॉर्म फी हे खाद्यपदार्थांच्या ऑर्डरवर नाममात्र फ्लॅट चार्ज आहे. हे शुल्क आम्हाला आमचे प्लॅटफॉर्म ऑपरेट करण्यात आणि त्यात सुधारण्यात मदत करेल. तसंच याद्वारे आम्हाला ॲपची फिचर्स वाढवण्यासही मदत मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली. स्विगी आपल्या नफ्याचं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, कंपनी लवकरच शेअर बाजारात एन्ट्री घेण्याच्या तयारीत असल्याच्याही चर्चा आहेत. यामुळे कंपनी असे उपक्रम राबवत आहे.

कंपनीनं बंद केलेलं हे वर्टिकलकंपनीनं जानेवारीमध्ये त्यांचं मीट मार्केटप्लेस वर्टिकल बंद केलं होतं. त्यानंतर रिस्ट्रक्चरींग प्रक्रियेअंतर्गत त्यांनी ३८० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होते. सॉफ्टबँक-समर्थित फूड डिलिव्हरी कंपनीनं या वर्षी मार्चमध्ये आपला क्लाउड किचन व्यवसायही विकला. क्लाउड किचन ऑपरेटर Kitchens@ नं शेअर स्वॅप डीलद्वारे स्विगीच्या ॲक्सेस किचन व्यवसाय विकत घेतला. ज्यामध्ये स्विगी Kitchens@ मध्ये भागधारक बनली.

टॅग्स :स्विगीअन्नव्यवसाय