Join us  

Swiggyच्या माजी कर्मचाऱ्यानं केला ₹३३ कोटींचा घोटाळा, IPO येण्यापूर्वी कंपनीला मोठा झटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 3:05 PM

ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीनं आपल्या एका माजी कर्मचाऱ्यावर ३३ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. पाहा काय आहे प्रकरण?

ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीनं आपल्या एका माजी कर्मचाऱ्यावर ३३ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यानं गेल्या काही वर्षांत हा गैरव्यवहार केला असल्याचं त्यांनी म्हटलंय. आर्थिक वर्ष २०२४ च्या कंपनीच्या वार्षिक अहवालातून ही माहिती मिळाली आहे. मनीकंट्रोलनं या संदर्भातील माहिती दिली आहे. हे प्रकरण अशा वेळी समोर आलंय, जेव्हा स्विगी आपला आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

स्विगीनं या प्रकरणाच्या तपासासाठी बाहेरील टीम नेमली असून कर्मचाऱ्याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंपनीने ४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात म्हटलंय की, चालू वर्षात समूहानं आपल्या एका उपकंपनीत सुमारे ३२.६७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं आढळले आहे. मागील वर्षी एका माजी कनिष्ठ कर्मचाऱ्यानं या रकमेचा अपहार केल्याचंही त्यात नमूद केलंय. चौकशीच्या निष्कर्षांचा आढावा घेतल्यानंतर समूहाने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात वरील रक्कम खर्च म्हणून नोंदविली असल्याचंही समोर आल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय.

स्विगीनं यावर्षी २६ एप्रिल रोजी गोपनीय मार्गानं आपल्या आपल्या आयपीओसाठी ड्राफ्ट पेपर सादर केले होते. स्विगीनं आपल्या आयपीओच्या माध्यमातून सुमारे १०,४१४ कोटी रुपये उभे करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. यापैकी ३,७५० कोटी रुपये नवीन शेअर्स जारी करून उभे केले जातील. तर सुमारे ६,६६४ कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल (OFS) आणला जाणार आहे.

कंपनीचा महसूल वाढला

स्विगीचा महसूल आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ३६ टक्क्यांनी वाढून ११,२४७ कोटी रुपये झाला आहे. त्याचबरोबर त्याची तूटही ४४ टक्क्यांनी कमी होऊन ४,१७९ कोटी रुपयांवरून २,३५० कोटी रुपयांवर आली आहे. खर्चावर नियंत्रण ठेवल्यानं कंपनीचा तोटा कमी होण्यास मदत झाली. असं असलं तरी स्विगीपेक्षा सध्या त्यांची प्रतिस्पर्धी कंपनी झोमॅटो पुढे आहे. झोमॅटोचा मार्केट शेअर ५७ टक्के आहे.

टॅग्स :स्विगीइनिशिअल पब्लिक ऑफरिंग