नवी दिल्ली : जागतिक मंदीच्या भीतीने अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. अॅमेझॉन, ट्विटर, गुगल आणि मायक्रोसॉफ्टनंतर फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी देखील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार करत आहे. स्विगीने सांगितले आहे की, कंपनी आपल्या 10 टक्के कर्मचार्यांना काढून टाकू शकते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्विगीमधील आगामी कर्मचारी कपातीमुळे कंपनीच्या प्रोडक्ट, इंजीनिअरिंग आणि ऑपरेशन्स सारख्या कार्यक्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी कर्मचारी कपात कॅश बर्न कमी करण्यासाठी स्विगीच्या त्वरित वाणिज्य वितरण सेवेवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. कंपनीने आगामी कर्मचारी कपातीवर मीडियाच्या प्रश्नांना काहीच प्रतिसाद दिला नाही. यापूर्वी डिसेंबरमध्ये समोर आलेल्या वृत्तांत असे म्हटले होते की, स्विगी जानेवारीपासून 250 पेक्षा जास्त कर्मचारी किंवा 5 टक्क्यांपर्यंत कर्मचारी काढून टाकू शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरची कामगिरी पाहता कपात करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे. कंपनीत जवळपास सहा हजार कर्मचारी कार्यरत आहेत. आधीच्या विधानात स्विगीने म्हटले होते की, कोणतीही कपात करण्यात आली नाही आणि सर्व काही सुरळीत सुरू आहे. पण, जी कपात होईल ती कार्यक्षमतेवर आधारित असल्याची शक्यता आहे.
कंपनीचा दुप्पट तोटा
मागील आर्थिक वर्षातील 1,617 कोटींच्या तुलनेत आर्थिक वर्ष-22 मध्ये ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीचा तोटा दुप्पट वाढून 3,629 कोटी रुपये झाला. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या वार्षिक आर्थिक विवरणानुसार, आर्थिक वर्ष-22 मध्ये एकूण खर्च 131 टक्क्यांनी वाढून 9,574.5 कोटी रुपये झाला आहे.