Shark Tank India : तुम्ही शॉर्क टँक इंडिया शोचे चाहते असाल तर तुमच्यासाठी मोठी अपडेट आहे. लवकरच शॉर्क टँक इंडियाचा चौथा सिझन सुरू होणार आहे. स्विगी कंपनी शार्क टँकच्या चौथ्या सीझनची स्पॉन्सर असणार आहे. हा व्यवहार २५ कोटी रुपयांना होणार आहे. या शोच्या माध्यमातून स्विगी मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपेंद्र गोयल शॉर्क टॅक्सच्या चौथ्या सीझनमध्ये गुंतवणूकदार म्हणून सहभागी होणार नाहीत, अशी अट स्विगीने घातली आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली. सध्या स्विगी आणि झोमॅटो मध्ये बाजारात तगडी स्पर्धा सुरू आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये खाद्यपदार्थ आणि किराणा मालाच्या वितरणात एकमेकांना मागे टाकण्याची स्पर्धा सुरू आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत दोघांचा बाजारातील हिस्सा जवळपास समान होता. पण, झोमॅटो आता दोन्ही व्यवसायात स्विगीपेक्षा खूप पुढे गेली आहे. मनीकंट्रोलने याबद्दल वृत्त दिलं आहे.
स्विगीचा मजबूत ब्रँड करण्यावर लक्ष
स्विगीने सेबीकडे दाखल केलेल्या अद्ययावत मसुद्याच्या प्रॉस्पेक्टसमध्ये म्हटले होते, की IPO मधून उभारल्या जाणाऱ्या ३,७५० कोटींपैकी ते ९५० कोटी रुपये ब्रँड मार्केटिंग आणि जागरूकता यासाठी वापरतील. याचे कारण कंपनीला आपल्या सेवांचा आवाका वाढवायचा आहे. आपली सेवा अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी स्विगी काम करणार आहे. दरम्यान, स्विगी, झोमॅटो आणि सोनी टेलिव्हिजनने यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.
दीपेंद्र गोयल शॉर्क टँकच्या तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी
सोनी टेलिव्हिजन वाहिनीवर शॉर्क टँक इंडिया कार्यक्रम प्रसारित केला जातो. हा कार्यक्रम अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे. त्याच्या चौथ्या सीझनचे शूटिंगही सुरू करण्यात आले आहे. पीपल ग्रुपचे अनुपम मित्तल, बोट लाइफस्टाइलचे अमन गुप्ता, एमक्योर फार्माच्या नमिता थापर, लेन्सकार्टचे पियुष बन्सल आणि ओयोचे रितेश अग्रवाल या सीझनमध्ये दिसणार आहेत. शार्क टँकच्या तिसऱ्या सिझनमध्ये दीपेंद्र गोयल पहिल्यांदाच गुंतवणूकदार म्हणून सहभागी झाले होते. कंपन्यांच्या संस्थापकांशी संवाद साधण्याच्या त्यांच्या शैलीचं खूप कौतुक झालं होतं.