नवी दिल्लीः पंतप्रधान स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी (PM-SVANidhi) योजनेंतर्गत पथ विक्रेत्यांसाठी आपल्या योजनेचा विस्तार 125 शहरांमध्ये करणार आहे, असे ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी (swiggy) कंपनीने म्हटले आहे. कोरोना संकटामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान केंद्र सरकारने पथ विक्रेते आणि लहान दुकानदारांना स्वस्त कर्ज देण्यासाठी स्वानिधी योजना सुरू केली आहे. स्विगीने एका निवेदनात म्हटले आहे की, पहिल्या टप्प्यात कंपनी 36,000 पथ विक्रेते जोडेल, ज्या अंतर्गत 125 शहरांमध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे कर्ज दिले गेले आहे.
स्विगीकडून निवेदन जारी
यासाठी स्विगीने गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयासोबत अहमदाबाद, वाराणसी, चेन्नई, दिल्ली आणि इंदूर येथे प्रायोगिक तत्वावर योजना लागू केली होती. ज्याअंतर्गत 300 हून अधिक पथ विक्रेते आधीच या प्लॅटफॉर्ममध्ये सामील झाले आहेत. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, प्लॅटफॉर्मवर सामील होताना पथ विक्रेत्यांची भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) मध्ये नोंदणी केली जाईल आणि त्यांना अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र दिले जाईल.
"सुरक्षा आणि स्वच्छतेसह ग्राहकांच्या दारात वैविध्यपूर्ण खाद्य पोहोचवण्याचे प्लॅटफॉर्म म्हणून आम्हाला आवडते स्ट्रीट फूड आणण्याचा आनंद आहे, जो कित्येक महिन्यांपासून हरवला होता," असे स्विगीचे सीईओ विवेक सुंदर यांनी सांगितले. तसेच, पथ विक्रेत्यांकडून खाद्यपान हा भारतातील सामान्य जीवनाचा एक भाग आहे आणि स्विगीला ही संधी दिल्याबद्दल गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे आभार विवेक सुंदर यांनी मानले.
या योजनेत किती मिळणार कर्ज
पीएम स्वानिधी योजनेंतर्गत जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. यामुळे व्यवसाय सुरू करण्यात मदत होईल. हे अगदी सोप्या नियमांसह दिले जाईल. यामध्ये कोणत्याही हमीची आवश्यकता भासणार नाही. अशा प्रकारे हे असुरक्षित कर्ज असेल.
कोण घेऊ शकेल याचा फायदा?
हे कर्ज रस्त्याच्या बाजूला असलेले हातगाडे चालक किंवा फेरीवाल्यांना देण्यात येईल. फळ-भाजीपाला, लॉन्ड्री, सलून आणि पान दुकाने देखील या कॅटगरीत समाविष्ट आहेत. ही दुकाने चालवतात ते देखील हे कर्ज घेऊ शकतात.