नवी दिल्ली : भारतास सेमीकंडक्टर क्षेत्रात अग्रगण्य बनविण्यासाठी तैवान भारतासोबत भागीदारी करण्यास इच्छुक आहे, असे प्रतिपादन तैवान चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन जेसन हो यांनी केले आहे.
इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार, ड्रोन आणि दूरसंचार उपकरणांमध्ये सेमीकंडक्टर म्हणजेच चिपचा वापर होतो. चिपचे उत्पादन एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची गरज असते. या क्षेत्रात तैवान जगात आघाडीवर आहे.
जेसन हो यांनी सांगितले की, डिझायनिंग क्षमता आणि मागणी या दृष्टीने भारत शक्तिशाली आहे. आमच्या चिप निर्मिती क्षमतेचा भारतात वापर केला जाऊ शकतो. (वृत्तसंस्था)
२८ एनएम चिपकडे लक्ष
तैवानकडे २८ नॅनोमीटर (एनएम) चिप निर्मितीची क्षमता आहे. दूरसंचार व वाहन क्षेत्रासाठी ही चिप आवश्यक आहे. या चिपकडे भारताचे विशेष लक्ष आहे. हो यांनी म्हटले की, भविष्यात भारतास चिप उत्पादनात गुंतवणुकीची गरज भासणार नाही. मी मोदी सरकारच्या मेक इन इंडिया योजनेशी सहमत आहे. सेमीकंडक्टरसारख्या क्षेत्रात भागीदारीची गरज आहे.