नवी दिल्ली : मुंबई येथील व्यावसायिकाविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे तसेच गैरमार्गाने त्याची फसवणूक करण्याच्या तक्रारीबाबत कोटक महिंद्रा बॅँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय अर्थ मंत्रालयाला केली आहे. या महिन्याच्या प्रारंभी बागला यांनी कोटक महिंद्रा बॅँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक व बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली होती. त्याची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने अर्थ मंत्रालयाच्या बँकिंग विभागाच्या सचिवांना याबाबत योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बागला यांनी याबाबत राष्ट्रपती कार्यालयाकडे कोटक यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी गृह मंत्रालयाकडे बाराखंबारोड पोलीस स्टेशनमधील तत्कालीन सहा पोलिसांच्या विरोधातही तक्रार केली आहे. या पोलिसांनी कोटक महिंद्रा बँकेच्या अधिका-यांच्या साथीने गैरमार्गाने आपल्यावर कारवाई केल्याची त्यांची तक्रार आहे. डॉ. संतोष कुमार बागला यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वीरेंद्र कुमार शर्मा यांनी आपली मालमत्ता कॉग्नंट इएमआर सोल्युशन्स लि. या कंपनीला दीर्घ लीजने भाडेतत्त्वावर दिली होती.
कालांतराने कोटक महिंद्रा बॅँकेने वीरेंद्र कुमार यांच्यासह एक कर्ज घोटाळा केला. त्यामध्ये संतोषकुमार बागला यांचा मुलगा भूपेंद्र याला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले. भूपेंद्र याच्याकडे अटकपूर्व जामीन असतानाही एका चुकीच्या खटल्यात त्याला अटक करण्यात आली. यानंतर न्यायदंडाधिका-यांनी कोटक महिंद्रा बॅँकेच्या विभागीय व्यवस्थापकांना नोटीस काढून माहिती मागविली. त्यावेळी हे कर्ज असुरक्षित स्वरूपाचे असून ते कॉग्नंट कंपनीला दिलेले होते. बागला यांना ते दिले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे न्यायमूर्तींनी बागला यांना मुक्त करण्याचे आदेश दिले. डिसेंबर 2018मध्ये न्यायालयाने बागला यांना क्लीन चिट देत मुक्त केले.
या प्रकरणात दिल्लीच्या सहा पोलीस अधिका-यांनी दुष्ट हेतूने भुपेंद्र यांना अटक केल्याची फिर्याद त्यांनी दाखल केली आहे. भूपेंद्र यांच्या चुकीच्या अटकेने त्यांचे लग्न मोडले, त्यांची समाजामध्ये मानहानी झाली तसेच त्यांना व्यवसायामध्ये मोठे नुकसान सोसावे लागले, असेही बागला यांनी तक्रारीत म्हटले आहे. यावर पंतप्रधान कार्यालयाने वरील निर्देश दिले आहेत.
उदय कोटक यांच्यावर कारवाई करा; पंतप्रधान कार्यालयाची अर्थ मंत्रालयाला सूचना
कोटक महिंद्रा बॅँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय अर्थ मंत्रालयाला केली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 04:47 PM2019-10-15T16:47:28+5:302019-10-15T16:48:30+5:30