प्रसाद गो. जोशी
नफा कमावण्यासाठी काही प्रमाणात विक्री झाली असली तरी शेअर बाजार निर्देशांकांनी साप्ताहिक वाढीचा चौकार लगावला आहे. आगामी काळात फेडरल रिझर्व्ह व जपानकडून होणारी व्याजदरांची घोषणा, तसेच ४०० कंपन्यांचे जाहीर होणारे निकाल हे बाजाराची दिशा ठरविणारे आहेत. बँकांचे शेअर्स आता गुंतवणूकदारांना मालामाल करणार का? याकडे लक्ष ठेवावे लागणार आहे. आगामी सप्ताहात दौदापूर्ती असल्यामुळे बाजारावर काही प्रमाणात विक्रीचे दडपण येण्याची शक्यताही आहे.
शेअर बाजारात गतसप्ताह संमिश्र राहिला. काही वेळा नफा कमाविण्यासाठी मोठी विक्री झाली असली तरी सप्ताहाचा विचार करता बाजारात वाढ झाली. संवेदनशील निर्देशांक ६२३.३६ अंशांनी वाढून ६६,६८४.२६ अंशांवर बंद झाला. तत्पूर्वी या निर्देशांकाने ६७,६१९.१७ अंश अशा नवीन उच्चांकाची नोंद केली आहे. निफ्टीला २० हजारांचा टप्पा गाठण्यात अपयश आले असले तरी त्यामध्ये १८०.५० अंशांनी वाढ झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे निर्देशांकही वाढले आहेत.
या सप्ताहात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व जपानच्या बँकेकडून होणारी व्याजदरांची घोषणा याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. त्याशिवाय सुमारे ४०० कंपन्यांचे जाहीर होणारे तिमाही निकाल बाजारावर परिणाम करू शकतात.
यामध्ये बहुसंख्य बँका असून, त्यांचे समभाग काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागून आहे. हेरिव्हेटिव्हजच्या व्यवहारांची सौदापूर्ती असल्याने बाजारावर काही प्रमाणात विक्रीचा ताण येऊ शकतो.
परकीय संस्थांची जोरात खरेदी
परकीय वित्तसंस्थांनी गत सप्ताहातही खरेदी सुरूच ठेवली आहे. या संस्थांनी सरलेल्या सप्ताहामध्ये १३,२०० कोटी रुपयांची खरेदी केली आहे. त्यामुळे जुलै महिन्यात या वित्तसंस्थांची खरेदी ४३,८०० कोटी रुपयांवर पोहोचली. मार्च महिन्यापासून या संस्था सातत्याने मोठ्या प्रमाणावर खरेदी करीत आहेत.