Join us

सिबिलच्या स्कोअरची अशी घ्या काळजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 10:18 AM

सिबिलमधील उत्तम स्कोअर हा चांगला क्रेडिट इतिहास आणि जबाबदार कर्जाच्या परतफेडीचे वर्तन सूचित करतो

प्रतीक कानिटकर, चार्टर्ड सेक्रेटरी

मागील लेखांतर्गत आपण सिबिल (CIBIL) स्कोअर किंवा अहवाल हा “क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेडद्वारा” व्यक्तीच्या वित्तीय डेटावर म्हणजेच बँकेतील व्यवहारांवर तसेच आजवर घेतलेल्या कर्ज परतफेडीच्या व्यवहारांवर आधारित तयार केला जातो, हे समजून घेतले. सिबिलमधील उत्तम स्कोअर हा चांगला क्रेडिट इतिहास आणि जबाबदार कर्जाच्या परतफेडीचे वर्तन सूचित करतो आणि म्हणूनच कर्ज मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये सिबिल स्कोअर अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो. साधारणपणे, व्यवसायात असुरक्षित व्यवसाय कर्जाचा लाभ घेण्यासाठी, तुमच्या कंपनीचा क्रेडिट अहवाल अत्यंत महत्वाचा ठरतो आणि म्हणूनच या लेखांतर्गत त्या व्यावसायिकांनी सिबिलची काळजी कशी घ्यावी, याबद्दल जाणून घेऊ:- 

कर्जाची वेळेवर परतफेड

थकित कर्जाची परतफेड न करणे याचा CIBIL स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. म्हणूनच कर्जाची EMI किंवा क्रेडिट कार्डची देय रक्कम वेळेवर भरा. ईएमआय चुकला तर तुमचा क्रेडिट स्कोअरदेखील कमी होतो. नियमित कर्ज परतफेडीने CIBIL स्कोअर सुधारण्यात मदत होते.   

CIBIL अहवालातील अज्ञात त्रुटी तपासा - तुमचा क्रेडिट इतिहास कमी करण्यात अनेक अज्ञात त्रुटी असू शकतात. त्यात चुकीची वैयक्तिक माहिती, चुकीचे खाते तपशील, न जुळलेली थकीत किंवा भरलेली रक्कम, डुप्लिकेट खाती, चुकीचे कर्ज देय इत्यादींचा समावेश असू शकतो. त्यावर नियंत्रणासाठी CIBIL च्या वेबसाइटवर निराकरण करून घ्या. 

सुरक्षित कर्जे व असुरक्षित कर्जे  यांचा योग्य समतोल -  क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन यासारखी असुरक्षित कर्ज आणि ऑटो लोन, होम लोन यांसारखी सुरक्षित कर्जे यांचा योग्य समतोल राखा. तुमच्याकडे एकाधिक असुरक्षित कर्जे असल्यास दोन्ही कर्जांमध्ये संतुलनासाठी प्री पेमेंट करण्याचा प्रयत्न करा.

सह-अर्जदार किंवा हमीदार होण्याचे टाळा - संयुक्त खातेदार किंवा कर्जाचा जामीनदार म्हणजेच गेरेटोर बनणे टाळा, कारण इतरांचे कोणतेही डिफॉल्ट तुमच्या CIBIL स्कोअरवर देखील दिसून येईल. कर्जदाराने कर्ज परतफेडीत चूक केल्यास, कर्जाच्या ईएमआयची परतफेड चुकवली किंवा उशीर केला तर कर्जदार, तसेच सह-अर्जदार किंवा जामीनदार या दोघांसाठी CIBIL स्कोअरमध्ये मोठी घसरण होऊ शकते. 

टॅग्स :पैसा