Join us

हवं तर एक्स्ट्रा पगार घ्या, पण कंपनी सोडू नका! सर्वच कर्मचाऱ्यांना रोखतेय ही कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 12:41 PM

Vodafone-Idea news: दुसरीकडे संधी मिळू लागल्याने वरिष्ठ पदांवरील गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या असेलेले अधिकारीही सोडण्याच्या तयारीत आहेत. काही कंपन्या रिक्त जागांवर पुन्हा भरती करत आहेत.

कोरोना काळात अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली होती. अनेक कंपन्या आताही करत आहेत. तर काही कंपन्या रिक्त जागांवर पुन्हा भरती करत आहेत. यामुळे मोठ्या संधी पुन्हा उपलब्ध होत आहेत. अशातच कर्मचारी ही संधी पाहून सोडून जाऊ नयेत म्हणून भारतातील एका बड्या टेलिकॉम कंपनीने कर्मचाऱ्यांना या महिन्यापासून जास्तीचा पगार ऑफर केला आहे. 

व्हो़डाफोन आयडियामध्ये कर्मचारी सोडून जाऊ लागले आहेत. दुसरीकडे संधी मिळू लागल्याने वरिष्ठ पदांवरील गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या असेलेले अधिकारीही सोडण्याच्या तयारीत आहेत. यामुळे व्होडाफोनआयडिया कंपनीने या कर्मचाऱ्यांना रोखण्यासाठी नोव्हेंबरमध्ये एक्स्ट्रा सॅलरी देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर कंपनीने मार्केटिंग डायरेक्टर अवनीश खोसला यांना प्रमोशन देऊन कंपनीने मुख्य मार्केटिंग अधिकारी बनविले आहे. ही पोझिशन गेल्या दोन वर्षांपासून रिक्त होती. 

जादा सॅलरी देताना कंपनीने एक अट ठेवली आहे, ती म्हणजे जे या योजनेचा लाभ घेतील त्यांनी 31 मार्च 2021 पर्यंत कंपनी सोडायची नाही. जर कोणता कर्मचारी असे करू शकला नाही त्याच्या फायनल सेटलमेंटमधून हा जादा दिलेला पगार कापला जाणार आहे. 

व्होडाफोन आयडिया सध्या मोठ्या संकटातून जात आहे. कंपनीवर एजीआरची थकबाकी खूपच आहे. याशिवाय कंपनीचे नेटवर्क आता पहिल्यासारखे ताकदवान राहिलेले नाही. जिओच्या स्पर्धेमुळे कंपनीचे ग्राहक सोडून जाऊ लागले आहेत. त्यांना थोपविणे कंपनीच्या हातात नसताना निदान कर्मचारी तरी हाताशी रहावेत, अशा प्रयत्नात कंपनी आहे. कंपनी सतत मोठा फंड गोळा करण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्या काही काळापासून कंपनीला अनेक मोठमोठे अधिकारी सोडचिठ्ठी देत आहेत. 

ऑक्टोबरमध्ये व्होडाफोनवर ओढवली होती नामुष्कीऑक्टोबरमध्ये व्होडाफोनवर तर मोठी नामुष्की ओढवली होती. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रभरात व्होडाफोनचे दोन दिवस नेटवर्क गायब होते. अनेकांनी तक्रारी करूनही कंपनीकडून काही उत्तर दिले जात नव्हते. कंपनीकडूनही ग्राहकांना काही ठोस उत्तर मिळत नसल्याने #vodafoneindia हा हॅशटॅग ट्रेंडिंगवर होता.  

टॅग्स :व्होडाफोनपैसानोकरीआयडिया