लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवासासाठी ‘आधी तिकिट काढा, पैसे नंतर द्या’ अशी नवी सेवा सुरु करण्याचे रेल्वेने ठरविले आहे.‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड ट्युरिझम कॉर्पोरेशन’चे प्रवक्ते संदीप दत्ता यांनी सांगितले की, प्रवाशांना तिकिट खरेदीचा हा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ‘आयआरसीटीसी’ने’ मुंबईतील ‘ई-पेलॅटर’ या कंपनीशी सहकार्य करार केला आहे. दत्ता म्हणाले की, ‘आयआरसीटीसी’च्या वेबसाइटवरून अशा प्रकारच्या तिकिट खरेदीचा पर्याय लवरकरच उपलब्ध होईल. या सेवेसाठी प्रवाशाकडून ३.५ टक्के सेवाकर घेतला जाईल व त्यामुळे प्रवासाच्या आधी पाच दिवस तिकिट काढून त्याचे पैसे नंतर १४ दिवसांत कधीही चुकते करण्याचा पर्याय त्यास उपलब्ध होईल.हा पर्याय ‘आयआर सीटीसी’च्या वेबसाइटवरून काढल्या जाणाऱ्या ‘ई-तिकिटां’नाच फक्त उपलब्ध असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.अधिक तपशील देताना दत्त यांनी सांगितले की, एखाद्या ग्राहकास क्रेडिट कार्ड देताना ‘सिबिल’कडून जशी त्याची पत पडताळणी केली जाते तीच पद्धत यासाठी अवलंबिली जाईल. ज्यांना या सेवेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना नाव, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, पॅन कार्ड किंवा आधार क्रमांक अशी माहिती द्यावी लागेल.पत पडताळणी करून ग्राहकास ही सेवा वापरण्याची मुभा मिळाली की त्याला ‘ओटीपी’ (वन टाइम पासवर्ड) पाठविला जाईल व तो वापरून त्यास पुढील व्यवहार करता येईल.
आधी तिकीट घ्या, पैसे नंतर द्या!
By admin | Published: June 02, 2017 12:35 AM