देशात खासगी क्षेत्रातील टॉप तीन टेलीकॉम कंपन्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपासून पुन्हा एकदा टेरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ करण्याची शक्यता आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या एका अहवालात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. एवढेच नाही, तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये या कंपन्यांचे उत्पन्न 20-25 टक्क्यांपर्यंत वाढू शकते, असेही यात सांगण्यात आले आहे.
रेटिंग एजन्सी क्रिसिलचा अहवाल -स्थानिक रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या एका युनिटच्या रिपोर्टनुसार, उद्योगा करिता नेटवर्क आणि स्पेक्ट्रममध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रति वापरकर्ता सरासरी उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. जर असे केले गेले नाही, तर सेवेची गुणवत्ता बिघडू शकते. रिलायन्स जिओ मार्केटमध्ये उतरल्यानंतर, तीव्र प्रतिस्पर्धा सुरू झाली होती. नंतर, डिसेंबर 2019 पासून या उद्योगाने दर वाढविण्यास सुरुवात केली होती.
15 ते 20 टक्के वाढ होण्याची शक्यता - अहवालानुसार, ‘‘...चालू आर्थिक वर्षात पहिल्या तीन कंपन्यांच्या महसुलात 20 ते 25 टक्क्यांपर्यंत जबरदस्त वाढ होणे अपेक्षित आहे.’’ तसेच, 2021-22 मध्ये प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (एआरपीयू) मध्ये पाच टक्क्यांच्या संत वाढीसह आता 2022-23 मध्ये 15 ते 20 टक्क्यांपर्यंत वृद्धी होणे अपेक्षित आहे, असेही या अहवालात म्हणण्यात आले आहे.