देशातील सण-उत्सवांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर सोने-चांदीची खरेदी करतात. देशातील ज्वेलरी क्षेत्रातील नामांकित ब्रँड तनिष्कचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. आता छोट्या शहरांमध्येही तनिष्क स्टोअर्स वेगानं सुरू होत आहेत. आज नफ्यात असलेलं तनिष्क (TATA-Tanishq) एकेकाळी बंद पडण्याच्या मार्गावर होता. एकेकाळी टायटनची ही कंपनी बंद होण्याच्या मार्गावर होती. परंतु आत तिच कंपनी टायटनसाठी संजीवनी ठरली आहे.
आज आम्ही तुम्हाला टाटांच्या तनिष्कच्या या यशाची कहाणी सांगणार आहोत. त्याची आलिशान दुकानं २४-२५ वर्षांपूर्वी सुरू झाली होती. उत्कृष्ट डिझाइन केलेले दागिने त्यात शोकेस करण्यात आले होते. एवढंच नाही तर टाटा कुटुंबाचं नावही या ब्रँडशी जोडलं गेलं. परंतु यानंतरही सकारात्मक गोष्टी हव्या त्या प्रमाणात घडत नव्हत्या. पण एका कल्पनेनं संपूर्ण परिस्थिती बदलून टाकली.
भारतात ब्रँडेड ज्वेलरीचा पहिला ब्रँड
भारतात ब्रँडेड ज्वेलरी सादर करणारा तनिष्क (Tanishq) हा पहिला ब्रँड आहे. आज टायटन कंपनी लिमिटेडच्या (Titan Company Ltd) या ब्रँडची देशभरात सुमारे ५०० स्टोअर्स आहेत. आज ही टायटन कंपनी तनिष्क आणि भारतीय आणि वेस्टर्न लूकच्या दागिन्यांसाठी ओळखली जाते. पण एकेकाळी ही कंपनी केवळ घड्याळं तयार करत होती. टायटन १९८४ मध्ये लॉन्च करण्यात आले. यानंतर टायटन इंडस्ट्रीजनं तामिळनाडूतील होसूर येथे प्रकल्प सुरू केला. ती कंपनी सोने आणि ब्रँडेड दागिन्यांच्या व्यवसायात उतरली. अशा प्रकारे भारतातील पहिल्या रिटेल ज्वेलरी ब्रँडचा जन्म झाला आणि त्याचं नाव तनिष्क ठेवण्यात आलं.
चेन्नईत पहिलं शोरूम
तनिष्कचं पहिलं शोरूम चेन्नई येथे १९९६ मध्ये उघडण्यात आलं होते. १८ कॅरेट सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने लाँच केले. सुंदर अशा वेस्टर्न आणि भारतीय डिझाईन्स, आलिशान शोरूम अशा प्रकारे दागिनं शोकेस केले गेले. पण तनिष्कासमोर एक समस्या निर्माण झाली. वास्तविक, भारतातील लोकांना २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची सवय होती. लोकांना असे १८ कॅरेट सोन्याचे दागिने आवडत नव्हते.
असं पालटलं चित्र
भारतीयांची पसंती लक्षात घेऊन टायटननं १९९९ मध्ये २२ कॅरेट सोन्याचे दागिनेही बाजारात आणले. त्यामुळे ग्राहकांची आवक काही प्रमाणात वाढली असली तरी त्यात विशेष फरक पडलेला दिसत नव्हता. दुसरीकडे, दागिन्यांचे उत्पादन आणि मार्केटिंगमध्ये भरपूर पैसा खर्च केला जात होता. टाटा समूहाच्या संचालक मंडळाकडून दागिन्यांचा व्यवसाय बंद करण्यासाठी दबाव होता. पण टायटनचे लोक त्यांच्या तनिष्क या ब्रँडला असे सोडायला तयार नव्हते.
यावेळी तनिष्कने एक प्रयोग करून पाहिला आणि तो खूप यशस्वी झाला. खरं तर, भारतीय दागिन्यांच्या बाजारपेठेत प्रथमच स्पेक्ट्रोस्कोपिक उपकरण कॅरेटमीटर सादर करण्यात आलं. यामध्ये एक्स-रेच्या मदतीने सोन्याची शुद्धता त्वरित तपासली जाते. कॅरेटमीटरची कल्पना इतकी मजबूत होती की त्या कल्पनेनं तनिष्कचं चित्रच पालटलं.
नफ्यात आली कंपनी
लोक तनिष्कच्या शोरूममध्ये येऊन दागिन्यांची शुद्धता अगदी मोफत तपासू शकतात अशी जाहिरात कंपनीनं करण्यास सुरुवात केली. यानंतर तनिष्कच्या शोरूममध्ये लोकांची गर्दी व्हायला लागली. या काळात कॅरेटमीटरनं ग्राहक आणि तनिष्क यांच्यात विश्वासाचा पूल बांधला. आज तनिष्क हा भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी ब्रँड आहे आणि त्यानं टायटनला ज्वेलरी व्यवसायाचा किंग बनवलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
एकेकाळी बंद होण्याच्या मार्गावर होती Tanishq; एक आयडिया आणि चित्रच पालटलं, आता बंपर कमाई
तनिष्क हा भारतातील पहिला ब्रँडेड ज्वेलरी ब्रँड म्हणून ओळखला जातो.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 10:17 AM2023-10-19T10:17:42+5:302023-10-19T10:19:32+5:30