नवी दिल्ली : अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर सूट दिल्यानंतर भारताकडून अमेरिकेला पाठवल्या जाणारे आयफोन, स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप चीनच्या तुलनेत २० टक्के स्वस्त होतील. यामुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला चालना मिळण्याची शक्यता वाढली आहे. यातून भारताची निर्यात लक्षणीय वाढेल, शिवाय १० ते १५ लाख नव्या नोकऱ्या निर्माण होतील, असे उद्योग संघटना आयसीईएने म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चीनमध्ये आयफोन, लॅपटॉप, टॅब्लेट आणि घड्याळांवर अजूनही २० टक्के टॅरिफ आहे. भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या सर्व आयफोन, स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टॅब्लेटवर शून्य शुल्क आहे. त्यामुळे भारत आणि व्हिएतनामला चीनपेक्षा २० टक्के शुल्क फायदा होणार आहे, असे आयसीईएने म्हटले आहे.
ई-कॉमर्ससाठी मोठी संधी
अमेरिकेच्या चीनमधून कमी किमतीच्या ई-कॉमर्स आयातीवरील कारवाईमुळे भारतीय ऑनलाइन निर्यातदारांसाठी एक मोठी संधी आहे. सरकारी पातळीवरील अडथळे दूर झाले तर भारताला मोठा फायदा होणार आहे.
जीटीआरआय या जागतिक संशोधन संस्थेने म्हटले की, १ लाखाहून अधिक ई-कॉमर्स विक्रेत्यांसह आणि सध्या पाच अब्ज डॉलर्सच्या निर्यातीसह हस्तकला, फॅशन आणि घरगुती उपकरणे यांसारख्या वस्तूंमुळे भारतासाठी मोठी संधी आहे.
भारत अमेरिकेला निर्यात करत असलेली प्रमुख उत्पादने
स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टॅबलेट्स, स्मार्टवॉच, इलेक्ट्रॉनिक्स ॲक्सेसरीज, सेमीकंडक्टर, इंडस्ट्रियल/मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स.
- ५५% वाढ मोबाइल फोन निर्यातीत झाली आहे.
- २ लाख कोटी रुपयांचे मोबाइल फोन २०२४-२५मध्ये भारतातून निर्यात होण्याची शक्यता असून, हा आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांक आहे.
- १.२९ लाख कोटी रुपयांचे स्मार्टफोन २०२३-२४ मध्ये निर्यात करण्यात आले आहेत.
- १.५ लाख कोटी रुपयांचे स्मार्टफोन भारतातून निर्यात करण्यात आले आहेत.
भारताचा फायदा काय?
१) भारतातून निर्यातीत मोठी वाढ होईल.
२) स्थानिक पातळीवर हजारो नव्या नोकऱ्या निर्माण होतील.
३) जागतिक बाजारात भारताची स्पर्धात्मकता वाढेल.
४) नवीन गुंतवणूकदार आकर्षित होतील
५) चलनवाढ नियंत्रणात ठेवण्यास मदत